मुंबई – 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये एका मोठ्या अभिनेत्याचा मृतदेह सापडल्याची बातमी माध्यमांसमोर आली आणि बॉलिवूड विश्वात एकच खळबळ उडाली. अभिनेत्याच्या खोलीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह होता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले, तर कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा आरोप केला होता.
मुंबई पोलिस, बिहार पोलिस, एनसीबी, ईडी आणि सीबीआय अशा एकूण पाच एजन्सींनी या प्रकरणाचा तपास केला. सीबीआय-ईडीचा तपास अजूनही सुरू आहे. एनसीबीचे प्रकरण न्यायालयात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 35 जणांना अटक करण्यात आली होती. तीन वर्षे उलटून गेली, पण या प्रकरणात एकही व्यक्ती अद्याप दोषी नाही, ना कोणी तुरुंगात आहे.
ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेलेले सर्वजण जामिनावर बाहेर आले आहेत. दरम्यान या प्रकरणी सीबीआयकडे माहिती अधिकाराखाली उत्तर मागितल्यानंतर, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचे उत्तर मिळाले आहे.
तसेच आरटीआय कायद्याच्या कलम 8(आय)(एच) अंतर्गत, सध्या केसची माहिती दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली? याचा तपास अजूनही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.