नांदेड : आज भाजपमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 10 वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं, मी पक्षाची आभारी आहे असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची जवाबदारी देण्यात आली होती. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने होत्या नाराज सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचं तिकीटासाठी त्या आग्रही होत्या. पण ती जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली होती. कोण आहेत सूर्यकांता पाटील? 1970-1972 – जनसंघ नेत्या, भाजप महिला आघाडी प्रमुख. 1974 – नांदेड काँग्रेस नांदेड पलिकेसाठी उमेदवारी (8 वर्ष नगरसेविका) 1980 – हदगाव विधानसभेमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकल्या.(1980-1985 साली विधानसभा सदस्य) 1986 – राजीव गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर घेतले. 1991 – नांदेड लोकसभा काँग्रेसकडून 1लाख 37 हजार विक्रमी मतांनी विजयी. 1996 – काँग्रेसकडून हिंगोली लोकसभा निवडणूक लढली आणि विजयी झाले . 1999 – राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1999 – राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभा लढवली, विजयी झाल्या. 2004 – राष्ट्रवादीकडून लोकसभा सदस्य. 2009 – राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. 2014 – पर्यंत राष्ट्रवादीत राहिल्या . 2014 – साली काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिल्याने, त्यांनी भाजपात प्रवेश केला.