- अग्निशामक दलाच्या जवानांमुळे पक्षी सुखरुप
पिंपरी – पन्नास फूट उंचीवर मांजामध्ये अडकलेल्या घारी सुखरूपरित्या सुटका करण्यात आली. पिंपरी- चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी रविवारी (दि. 31) दुपारी ही कामगिरी केली.
सेंट अँड्रूज स्कूलजवळ काळभोरनगर, एमआयडीसी चिंचवड येथील झाडावर एक पक्षी अडकला असल्याची माहिती प्राधिकरण येथील उपअग्निशामक केंद्रास रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो पक्षी झाडावर 50 फूटावर अडकला असल्याचे दिसून आले. यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या पथकाने मुख्य अग्निशामक केंद्रातून ब्रांड स्काय लिफ्ट हे वाहन बोलावून घेतले. त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक 55 मीटर उंचीच्या शिडीतून घार अडकलेल्या ठिकाणी पोचले. मांजामध्ये अडकलेल्या घारीची त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये सुटका केली.
अग्निशामक दलाचे अधिकारी प्रताप चव्हाण, वाहन चालक नितीन कोकरे, विशाल फडतरे फायरमॅन संतोष सरोटे, भूषण येवले, पंकज येडके, अभिजीत घाडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.