बोस्टन- मानवी मेंदूची शस्त्रक्रिया ही सर्वात अवघड प्रक्रिया मानली जाते. या शस्त्रक्रियानंतर अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात; पण बोस्टनमधील एका रुग्णालयातील 10 डॉक्टरच्या पथकाने एक असा चमत्कार करून दाखवला आहे.
त्यांनी एका मातेच्या गर्भाशयात अद्याप जन्मालाही न आलेल्या एका मुलीच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांनी या मुलीचा जन्म झाला. डेनवर कोलमन असे या मुलीचे नाव असून ती सध्या सात आठवड्याची आहे.
बोस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर्सनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. अद्याप जन्मालाही न आलेला या मुलीच्या रक्तामध्ये काही दोष होता. हा दोष दूर करण्यासाठी मेंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मेंदूपासून हृदयापर्यंत रक्त घेऊन जाणाऱ्या नसा पुरेशा विकसित झाल्या नव्हत्या.
त्यामुळे या मुलीला काही समस्या निर्माण होण्याचा धोका होता. या रक्तवाहिन्या खराब असल्यामुळे या लहान मुलीच्या मेंदूमध्ये रक्त जमा होऊ लागले होते. वैद्यकीय तपासणीमध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला;
पण ही क्रिया अतिशय अवघड होती कारण शस्त्रक्रिया करण्यासाठी मातेच्या गर्भाशयातच या गर्भाची अवस्था बदलावी लागणार होती. शस्त्रक्रिया करता येईल अशा प्रकारे या गर्भाला फिरवण्यात येणार होते. ही पहिली प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली नंतर मातेलाही वेदना होऊ नयेत म्हणून तिला अनेस्थेशीया देण्यात आला आणि गर्भालाही इंजेक्शन देण्यात आले.
नंतर अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि एका मोठ्या सुईच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेसाठी डॉक्टर्सना 20 मिनिटे लागली नंतर जेव्हा या गर्भाचा रक्तदाब नॉर्मल झाल्याचे लक्षात आले तेव्हा डॉक्टरनी सुटकेचा निश्वास टाकला आता 7 आठवड्यानंतर या मुलीची तब्येत उत्तम आहे