बीडः राज्यात बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर संतापाची लाट आहे. त्यांच्या हत्येचा प्रश्न बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील धस यांनी पत्रव्यवहार केला होता.
दरम्यान, बीडमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धघाटनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार प्रकाश सोळंखी, खासदार बजरंग सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खाऊन टाकतात. महायुतीचं सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतली. मराठवाड्याला कृष्णा खोरेचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे आणि मराठवाड्याततील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते सगळे काम पूर्ण झाले नाही. २३ टीएमसी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाणी सापडले. या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ होणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचे पाणी, थेट समुद्रात जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणीत नाहीत तोपर्यंत मराठवाडा दुष्काळ मुक्त होणार नाही. त्यासाठी गोदावरीच्या एकात्मिक आराखडा बनवला आहे. त्या माध्यमातून ५३ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले पाहिजे, मी माझे भाग्य समजतो पुन्हा माझ्यावर जलसिंचनची जबाबदारी आली. या प्रकल्पाचे सगळे अडथळे दूर केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
धसांकडून फडणवीसांना बाहुबली उपाधी
आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा भाषणादरम्यान उल्लेख बाहुबली असा केला. तसेच त्यांचे कौतुक केले. बाकी कुणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा असल्याचे धस यावेळी बोलताना म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत मला निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे यांची मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.