Surendra Kevat : खळबळजनक ! भाजप नेते सुरेंद्र केवट यांची गोळ्या घालून हत्या

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भारतीय जनता पक्षाचे सुरेंद्र केवट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र केवट यांच्यावर दुचाकीस्वार तरुणांनी चार गोळ्या झाडल्या. नंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. गेल्या काही दिवसांतली पाटण्यामधली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.सुरेंद्र केवट हे भाजप किसान मोर्चाच्या पुनपुन ब्लॉकचे माजी अध्यक्ष होते.
गोळीबारानंतर स्थानिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत पाटणा एम्समध्ये नेले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुलवारी शरीफ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपाल रविदास आणि माजी मंत्री श्याम रजक एम्समध्ये पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. त्यांनी प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पिपरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमकडून फॉरेन्सिक तपासणी सुरु होती. घटनेनंतर गावात आणि परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण आहे.
सततचा गोळीबार…
सुरेंद्र केवट यांच्यापूर्वी राज्यातील प्रसिद्ध व्यापारी गोपाळ खेमका यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. खेमका यांना त्यांच्या घराबाहेरच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बिहारमध्ये सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटना केवळ पटनापुरत्या मर्यादित नाहीत. गेल्या काही दिवसांत सीतामढी, गया, नवादा, बेगुसराय आणि मुझफ्फरपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून नितीश सरकारवर निशाणा साधला आहे.





