सासवड: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलिगत किंग’ म्हणून ओळखला जाणारा सूरज चव्हाण अखेर विवाहबंधनात अडकला आहे. आज सूरज आणि त्याची लाडकी संजना गोफणे यांचा शाही लग्नसोहळा पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. या लग्नसोहळ्याची प्रत्येक लहान-मोठी अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, लग्नानंतर हा विजेता आपला हनिमून कुठे साजरा करणार, याचे संकेत एका व्हिडिओमधून समोर आले आहेत. दोन कोटींच्या आलिशान गाडीतून ‘गुलिगत’ एन्ट्री – पुरंदरचे जावई ठरलेला सूरज चव्हाण आज संजना गोफणेसोबत लग्न करत आहे. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. लग्नापूर्वीचे हळदी आणि मेहंदी समारंभ जोरदार गाजले. विशेष म्हणजे, संजनाने आपल्या मेहंदीवर केवळ सूरजचे नावच नव्हे, तर त्याचा फेमस डायलॉग ‘झापुक झुपूक’ देखील कोरून घेतला आहे. लग्नाच्या दिवशी सूरजने तब्बल २ कोटी रुपये किंमतीच्या आलिशान गाडीतून लग्नमंडपात ‘राजेशाही’ एन्ट्री केली. ‘सूरजची एन्ट्री’ म्हणत त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. उखाण्यातून उलगडलं हनिमूनचं ठिकाण- सूरजच्या लग्नसोहळ्याला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली आहे. ‘किलर गर्ल’ जान्हवी किल्लेकर, डीपी दादा उर्फ धनंजय पवार आणि इरिना रुडाकोवा हे या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी जेजुरी-सासवड परिसरात दाखल झाले. यादरम्यान, सूरज आणि त्याचे मित्र डीपी दादा यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डीपी दादा सूरजला उखाणा घ्यायला सांगतात. त्यावर सूरज विनोदी शैलीत उखाणा म्हणतो, “आई मारी मातेचं दर्शन झालं. लग्न आहे उद्या, दादा महाबळेश्वरचं काय झालं?” हा उखाणा घेतल्यानंतर डीपी दादांनी लगेचच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला “कुठं कुठं जायचं हनिमूनला” हे गाणं लावून पोस्ट केला आहे. त्यामुळे ‘गुलिगत किंग’ सूरज चव्हाण लग्नानंतर महाराष्ट्रातील निसर्गरम्य स्थळ महाबळेश्वरला हनिमूनसाठी जाणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. आज सायंकाळी ६ वाजता हा विवाह सोहळा संपन्न झाला, गेल्या दोन दिवसांपासून सूरज-संजना यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.