मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील १० महिन्यांपर्यंत मुंबईच्या घराचे तोंड न पाहण्याचा निर्धार केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे. मी माझ्या कुटुंबीयांनाही त्याची कल्पना दिली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या धास्तीमुळे सुप्रिया सुळेंनी बारामतीत डेरेदाखल होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच आपण १०-१५ वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघाकडे लक्ष्य दिले नसल्याचे स्पष्ट केले होते. बारामतीमधील ग्रामपंचायती, वेगवेगळ्या सहकारी सोसायट्या किंवा अन्य संस्थांच्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक पदाधिकारीच लक्ष घालत होते. मी त्यात लक्ष घालत नव्हतो, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पुढील १० महिन्यांपर्यंत बारामतीतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. हा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सत्ताधारी भाजपने अनेक प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण आता पवार कुटुंबातीलच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. त्यातच त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा लोकसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार गटाने बारामती तालुक्यातील ३१२ पैकी २९ ग्रामपंचायतींवर आपले पॅनेल निवडून आणून दाखवले होते. यावरूनही अजित पवारांचा या मतदारसंघावरील वरचष्मा दिसून येतो. यामुळेही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची काळजी वाढली आहे. काय म्हणाल्या सुळे? लोकसभा व विधानसभेची निवडणूक होईपर्यंत म्हणजे पुढील १० महिने मी बारामतीतच राहणार आहे. माझी गाडी मुंबईला जाणार नाही. मी माझा नवरा व मुलांनाही त्याची कल्पना दिली आहे. यापुढे माझ्या नवऱ्याला व मुलांना मला भेटायचे असेल तर इथे पुणे, बारातमी किंवा इंदापुरात यावे लागेल, असे सुप्रिया सुळे यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे.