Supriya Sule on Ajit Pawar। मी व माझ्या कुटुंबाविरोधत इतर कुटुंबिय प्रचार करतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत केले होते. त्या टिकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय. “आमच्या कुटुंबाला राजकारणात कशाला खेचता?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. “सर्वचजण माझे कुटुंबिय आहेत. त्यांचे (अजित पवार) कुटुंबदेखील माझे कुटुंब आहे. असे वेगवेगळे कुटुंब दाखवता येत नाहीत. “रिश्ते दिल से बनते है यार, ऐसा नही होता”, असे म्हणत त्यांनी म्हटले.
राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही Supriya Sule on Ajit Pawar।
पुढे त्यांनी, “राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही. यात नाती महत्त्वाची नसतात, तर जबाबदारी महत्त्वाची असते. नाती ही प्रेमाची असतात. मी नाती आणि काम यात गल्लत करत नाही. माझी नाती एका जागेवर आणि काम दुसऱ्या जागेवर आहे. माझी नाती पवार, सुळे, भट आणि शिंदे या नावापुरती मर्यादित नाहीत. रक्ताची नसली तरी माझी मतदारसंघात प्रेमाची नाती अनेक आहेत.
नाती माझ्यासाठी नेहमी महत्त्वाची आहेतच. पण माझे कामही तेवढेच महत्त्वाचे आहे. माझी एक विचारसरणी आहे, ज्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नसून वैचारीक आहे. माझी लढाई वैयक्तिक कोणत्या व्यक्तीशी नसून माझी लढाई भाजपा आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यांच्या आघाडीमध्ये जो कुणी त्या विचाराने काम करत असेल तर त्या विचारांशी माझी लढाई आहे”, असेही स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले.
सेल्फी प्रमोशन देशाचे पंतप्रधान करतात Supriya Sule on Ajit Pawar।
सेल्फी काढण्याच्या टीकेलाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शिक्षण खात्याने एक शासन निर्णय काढला होता, त्यात प्रत्येक महाविद्यालयात मोदींचा फोटो लावून सर्व विद्यार्थ्यांना त्यासोबत सेल्फी काढण्यास सांगितले होते. दुसरीकडे स्मृती इराणी यांना एक कोटी महिलांसह सेल्फी काढण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, असेही बातम्यात मी वाचले. तसेच स्टेशन, महाविद्यालय सगळीकडे मोदींच्या फोटोचे सेल्फी पॉईंट उभारण्याचे निर्देश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळावर प्रवेश केल्या केल्या पंतप्रधान मोदींचा सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीत, तर देशाचे पंतप्रधान करत आहेत.