Supriya Sule : “भुजबळ दिल्लीला आले असते तर…”; सुप्रिया सुळेंचे विधान
Supriya Sule : छगन भुजबळांना दिल्लीला यायचं असेल त्यामध्ये गैर काय? - सुप्रिया सुळे

Supriya Sule : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर आज राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. दरम्यान, छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या राजकीय योगदानाचे कौतुक केले आहे. (Supriya Sule )
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? (Supriya Sule)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू? त्यांच्या पक्षात किंवा कुटुंबात काय सुरू आहे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात आदर, प्रेम राहिलं आहे. त्यांनी शून्यातून खूप मोठं विश्व उभं केलं. त्यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत ते अनेक वर्षे ते सुख-दु:खात राहिलेले आहे, याची जाणीव मला आहे.
मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन. ते दुखावले असतील मला याची माहिती नाही. पण ते आयुष्याच्या ज्या टप्प्यावर भुजबळ उभे आहेत, त्यांनी जो त्याग केला, कष्ट केलेत, त्यानंतर त्यांना दिल्लीला यायचं असेल त्यामध्ये गैर काय?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आम्ही एकत्र असतानाही शरद पवारांचा फार आग्रह होता, भुजबळांचं नेृतृत्व फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व मिळालं पाहिजे. भुजबळ दिल्लीत गेले असते, तर देशाला एक अनुभवी आणि सक्षम नेतृत्व मिळाले असते. तसेच आमच्यासारख्या नव्या खासदारांनाही त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला असता, पण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण भुजबळ दिल्लीला आले असते तर मला मनापासून आनंद झाला असता. त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असते”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. (Supriya Sule)
दरम्यान, छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेन, अशी अट ठेवली होती. परंतु त्यांची ही अट पूर्ण न झाल्याने भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:






