मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवल्यानंतर, भाजपने हा विजय स्वतःच्या नेत्यांच्या बळावर मिळवला की इतर पक्षांतून आलेल्या आयारामांमुळे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २०७ नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. विरोधी महाविकास आघाडीला एकत्रितपणे केवळ ४४ जागा मिळाल्या. सुळे म्हणाल्या, हे निकाल आश्चर्यकारक नव्हते, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. सत्तेत असलेले पक्ष अशा स्थानिक निवडणुका जिंकतात, हे देखील एक सत्य आहे. पण भाजपने हा विजय स्वतःच्या ताकदीवर मिळवला की इतर पक्षांतून आलेल्या आयारामांच्या ताकदीमुळे? असा सवाल त्यांनी केला. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवतील का, याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की दोन्ही बाजूंनी युतीसाठी कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला विकासाच्या अजेंड्यावर सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.