Kolhapur : 5 हजार रुपयांत दिवाळी साजरी होणार का?; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
Kolhapur : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केला. हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी केली.

Kolhapur : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीत दिवाळी साजरी होणार नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. मग दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. अजिंक्यतारा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील तसेच उमेदवार उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी राज्यातील महायुती सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली.
दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि लोकशाहीच्या हक्कांच्या मुद्द्यांवर सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. दैनंदिन वापरातील वस्तू महाग झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
‘जलजीवन मिशन’मधील कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच ‘आनंदाचा शिधा’ योजनेतील त्रुटींवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही
लोकशाहीमध्ये शांततेत आंदोलन करण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे सुळे म्हणाल्या. तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसून राष्ट्रीय ध्वज फडकवणाऱ्यांचे स्वागत झाले पाहिजे. तिरंगा फडकवणे जर गुन्हा मानले जात असेल, तर त्यासाठी प्राणांचे बलिदान देण्यासही आम्ही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, महागाई किती वाढली आहे आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर त्याचा काय परिणाम होत आहे, यावरही सुळे यांनी सरकारवर टीका केली.
ज्ञानेश कुमार यांना आमचा विरोध नाही; त्यांच्या कृतीला विरोध आहे, असे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मतांची चोरी होत असल्याचा आरोप केला जात आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री हसन मुश्रीफ भाजपसोबत गेल्याबाबत विचारले असता, ‘मी या मातीशी इमानदार आहे. त्यामुळे कोणाबद्दल बोलण्यास घाबरत नाही आणि मला बदलण्याची गरजही नाही,’ असे सुळे म्हणाल्या. मी मातीशी, मतदारांशी आणि जनतेशी इमानदार आहे. मी कोणतीही बेईमानी केलेली नाही. आमच्यावर दबाव आणला जाईल, पक्ष फोडले जातील, धाडी टाकल्या जातील किंवा अटक केली जाईल; यापेक्षा वेगळे काय होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.





