Supriya Sule : विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी; सुप्रिया सुळेंनी केली मागणी
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, जेव्हा एखाद्या देशाची तरुण पिढी अस्वस्थ असते, तेव्हा ती चिंतेची बाब असते. आम्ही यात राजकारण करत नाही. आम्हाला आमच्या मुलांसाठी न्याय आणि पारदर्शक परीक्षा हव्या आहेत. संसदेत मंजूर झालेल्या नवीन विधेयकाबाबत कोणीही समाधानी नाही.

Supriya Sule : विद्यार्थ्यांमधील वाढती अस्वस्थता ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि परीक्षेतील गैरप्रकारांमुळे बाधित झालेल्यांना न्याय मिळायला हवा. यासाठी नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवरील पोलीस बळाचा वापर आणि गोळीबाराबाबत एसआयटीद्वारे कालमर्यादित चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, जेव्हा एखाद्या देशाची तरुण पिढी अस्वस्थ असते, तेव्हा ती चिंतेची बाब असते. आम्ही यात राजकारण करत नाही. आम्हाला आमच्या मुलांसाठी न्याय आणि पारदर्शक परीक्षा हव्या आहेत. संसदेत मंजूर झालेल्या नवीन विधेयकाबाबत कोणीही समाधानी नाही.
यामुळे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि नीट परीक्षेचे आयोजन यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी केले. नीट परीक्षांमध्ये वारंवार पेपर फुटीच्या घटना घडल्या असल्या तरी, यूपीएससी परीक्षेत अशा प्रकारचे गैरप्रकार दिसून आलेले नाहीत.
देशात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे. अनेक कोचिंग संस्थांचे मोठ्या व्यवसायांमध्ये रूपांतर झाले असून त्या आता आयपीओ देखील आणत आहेत, असे त्या म्हणाल्या.पेपर फुटीच्या प्रकरणांमधील आरोपींसाठी केवळ शिक्षा वाढवून ही समस्या सुटणार नाही.
जोपर्यंत पेपर फुटीला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न कायम राहील. परीक्षांशी संबंधित समस्यांवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन संसदेत सविस्तर चर्चा करावी, असे त्यांनी (Supriya Sule) नमूद केले.






