Supreme Court : बीपीएससी मुख्य परीक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) मुख्य परीक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच गतवर्षी १३ डिसेंबर रोजी झालेल्या प्राथमिक चाचणीदरम्यान पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या याचिका बुधवारी फेटाळल्या आहेत. बीपीएससची मुख्य परिक्षा बुधवार, दि. २५ एप्रिल रोजी होणार आहे.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खंडपीठाने नमूद केले की, सर्व उमेदवारांसाठी पुन्हा चाचणी घेण्याचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे उपलब्ध नव्हते. यामुळे बीपीएससी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका रद्द करण्यात येत आहेत.
याचिकाकर्त्यांकडून हजर असलेल्या वरिष्ठ वकील अंजना प्रकाश यांनी युक्तिवाद केला की, व्हॉट्सअॅप मॅसेज आणि व्हिडिओ क्लिपसह डिजिटल पुरावे परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे दाखवतात. तसेच अशाच एका व्हिडिओमध्ये परीक्षा केंद्रावर लाऊडस्पीकरद्वारे उत्तरे जाहीर केल्याचे कथितपणे दिसत आहे.
यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी परीक्षा व्यवस्थेच्या अखंडतेचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रश्नपत्रिकांचे चार वेगवेगळे संच वापरले गेले होते, ज्यामध्ये एकसारखेपणा टाळण्यासाठी प्रश्न गोंधळलेले होते. तसेच कोचिंग सेंटरच्या साहित्याशी असलेल्या समानतेबद्दलच्या चिंतेचे निवारण करताना त्यांनी स्पष्ट केले की १५० प्रश्नांपैकी फक्त दोनच प्रश्न शब्दशः प्रती असल्याचे आढळले, असा दावा त्यांनी केला. यानंतर खंडपीठाने सादर केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या सत्यतेवर आणि व्याप्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच याचिकाकर्त्यांना तक्रारींसह पाटणा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.





