“विजय शाहांना अटकेपासून तूर्त दिलासा, पण SIT करणार चौकशी ; कर्नल सोफिया प्रकरणी शाह यांच्या अडचणीत वाढ

Supreme Court on Vijay Shah। कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांना पुन्हा एकदा फटकारले आहे. तसेच या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.त्यामुळे आता विजय शाह यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान विजय शहा यांची माफी नाकारली आहे. पण त्यांच्या तात्काळ अटकेलाही स्थगिती दिली आहे. यासोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या एसआयटीमध्ये तीन आयपीएस अधिकारी असतील, ज्यात एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश Supreme Court on Vijay Shah।
न्यायालयाने मध्य प्रदेशाबाहेरील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने म्हटले की आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवू. या संदर्भात मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने म्हटले की, आम्ही एसआयटीला या तपासाचे निकाल राज्य अहवालाद्वारे सादर करण्याचे निर्देश देतो. एसआयटी २८ मे रोजी या प्रकरणाचा पहिला अहवाल सादर करेल.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने विचारले की तुम्ही माफी मागितली आहे का? न्यायालयाने विजय शाह यांना त्यांनी काय सांगितले आणि कशासाठी माफी मागितली याचा व्हिडिओ दाखवण्यास सांगितले. तुम्ही माफी कशी मागितली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काही लोक हातवारे करून माफी मागतात. काहींनी मगरीचे अश्रू ढाळले. आम्हाला जाणून घ्यायचे आहे. न्यायालयाने विजय शाह यांचे वकील मनिंदर सिंग यांना सांगितले की, आम्हाला तुमच्याकडून अशी माफी नको आहे. तुम्ही आधी चूक करता आणि नंतर न्यायालयात जाता. तुम्ही एक जबाबदार नेते आहात. तुम्ही विचारपूर्वक बोलावे पण तुम्ही खूप वाईट भाषा वापरली आहे.” असे म्हणत न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.
“आम्ही तुमचा माफीचा अर्ज फेटाळतो” Supreme Court on Vijay Shah।
यावर विजय शाह यांचे वकील मनिंदर सिंह म्हणाले की, “त्यांनी माफी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागणारा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, “माफी कशी मागितली जाते यावर ते अवलंबून आहे. तुमची भाषा आणि शैली तुम्हाला लाज वाटत नाहीये असे वाटत नाही. तुम्ही म्हणत आहात की जर कोणी दुखावले असेल तर तुम्ही माफ करा. आम्ही तुमचा माफीचा अर्ज फेटाळतो. ” असे म्हणत न्यायालयाने शाह यांना खडेबोल सुनावले. तसेच न्यायालयाने तसे म्हटले म्हणून तुम्ही माफी मागितली आहे. तुम्ही हे विधान १२ मार्च रोजी केले होते. तुम्हाला माहिती होते की जेव्हा जनतेच्या भावना सैन्याच्या आणि देशाच्या शौर्याच्या बाजूने होत्या, तेव्हा तुम्ही सार्वजनिकरित्या अशा अपशब्दांचा वापर केला.”असेही न्यायालयाने म्हटले.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, आम्हाला तुमच्या माफीची गरज नाही. हा न्यायालयाचा अवमान करण्याचा खटला नाहीये की माफी मागून तुम्ही त्यातून सुटू शकाल. तुम्ही न्यायालयात अर्ज दाखल करून माफीनामा याला जोडत आहात. आम्ही कायद्यानुसार त्यावर कारवाई करू शकतो. उच्च न्यायालयाने आपले कर्तव्य चोख बजावले आहे.” ते म्हणत त्यांनी शाह यांचा अर्ज फेटाळला.
मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर, महू तहसीलमधील मानपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. शाह यांच्याविरुद्ध तीन गंभीर कलम १५२, १९६(१)(ब) आणि १९७(१)(क) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. प्रत्यक्षात विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक विधान दिले होते. त्यांनी एका जाहीर सभेत कर्नल सोफिया कुरेशी यांचे नाव घेऊन वादग्रस्त विधान केले होते.





