Supreme Court: जाता-जाता सरन्यायाधीश चंद्रचूड यांची मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे सर्व खंडपीठांवरून थेट प्रक्षेपण होणार

नवी दिल्ली – एक महत्त्वाचे पाऊल उचलत सर्वोच्च न्यायालयाने सर्व खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या सर्व खंडपीठांचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुलभ करण्यासाठी एक ॲप चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी, आतापर्यंत केवळ घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी थेट प्रक्षेपण होत होती, परंतु सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने ती सर्व खंडपीठांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन सुनावणीचे नियमित थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
कोविड महामारीनंतर, 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटनापीठाच्या अंतर्गत खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची व्यवस्था केली होती, जी आत्तापर्यंत सुरू आहे. ते सर्व न्यायालयांमध्ये वाढविण्यात आले आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठांची सुनावणी पहिल्यांदा थेट प्रक्षेपित झाली तेव्हा 8 लाखांहून अधिक लोकांनी ती पाहिली.
त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, हे पाऊल दुर्गम भागातील लोकांचे अडथळे दूर करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहण्याची संधी मिळेल.
वास्तविक, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी प्रकरणांच्या वाटपात प्रगती आणि पारदर्शक व्यवस्था आणण्याचा प्रयत्न तर केलाच पण जलद सुनावणीच्या व्यवस्थेतही मोठा बदल घडवून आणला. पुढील महिन्यात 10 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना आता देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. यासंदर्भात त्यांनी आपली शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे.





