Supreme Court : 40 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केली महत्वपूर्ण टिपण्णी

नवी दिल्ली : 40 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी गुप्तांगांवर जखमांच्या खुणा असणे आवश्यक नाही. इतर पुरावे देखील आधार म्हणून घेतले जाऊ शकतात अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. 1984 मध्ये बीएच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या पुरूषाची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. त्या व्यक्तीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
एका ट्यूशन शिक्षकावर स्वतःच्याच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेच्या गुप्तांगावर कोणतेही निशाण नव्हते आणि त्यामुळे बलात्कार सिद्ध होऊ शकत नाही, असा युक्तिवाद शिक्षकाच्या वतीने करण्यात आला. पीडितेच्या आईने त्याच्यावर खोटे आरोप केले आहेत असा दावा त्याने केला होता. तथापि, न्यायालयाने आरोपीने मांडलेले युक्तिवाद फेटाळून लावले.
न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती वराळे म्हणाले की, प्रत्येक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळणे आवश्यक नाही. कोणताही खटला परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे बलात्कार सिद्ध करण्यासाठी पीडितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा असणे गरजेचे नाही.





