नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणी देशभरातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांवरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकांवर केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेनावर स्थगिती देण्यास पुन्हा नकार दिला. न्या. विक्रम नाथ आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठासमोर सदर सुनावणी पार पडली. या सुनावणीत खंडपीठाने एनटीएने दाखल केलेल्या चार वेगवेगळ्या याचिकांवर उत्तर मागणाऱ्या पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच केंद्र सरकार आणि एनटीएकडून नीट-यूजी 2024 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आणि न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशी करण्याच्या मागणीवर उत्तर मागविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील विविध उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेल्या सर्व याचिकांवर पुढील सुनावणीला स्थगिती दिली. ज्यात कथित पेपर लीकच्या प्रकरणांसह काही प्रलंबित याचिका उच्च न्यायालयांकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देशही दिले. दरम्यान, नीटसंबंधी इतर प्रलंबित याचिकांवर 8 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली.