नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी “सुस्वागतम’ पोर्टल सुरू करत असल्याची घोषणा केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी या पोर्टलची घोषणा केली. या पोर्टलमुळे वकील इंटर्न आणि इतरांना सर्वोच्च न्यायालयातील कामांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी ई-पास याच पोर्टलवरुन मिळणार आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जम्मू आणि काश्मीरला पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी एकत्र येताच याची घोषणा केली.
यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “सुस्वागतम्’ हे वेब आधारित आणि मोबाईल फ्रेंडली ऍप्लिकेशन आहे. जे युजर्सना ऑनलाईन नोंदणी करण्यास आणि कोर्टाच्या सुनावणीला उपस्थित राहणे,
वकिलांना भेटणे अशा विविध उद्देशांसाठी ई-पासची नोंदणी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. 25 जुलै 2023 पासून “सुस्वागतम्’ पोर्टलची पायलट प्रोजेक्ट म्हणून टेस्टिंग घेण्यात आली आणि त्याला युजर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
पुढे चंद्रचूड म्हणाले की, 9 ऑगस्टपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर पोर्टलद्वारे 10 हजारहून अधिक ई-पास जारी करण्यात आले आहेत. या पोर्टलमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामांसाठी सकाळी रांगेत थांबण्याची गरज नाही. सर्व पास ऑनलाईन मिळतील. आज सकाळपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.