Cough syrup case: कफ सिरप प्रकरण सुप्रीम कोर्टात; CBI चौकशीची मागणी, याचिकेत काय म्हटलंय?

Cough syrup case: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरप पिल्यानंतर अनेक बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत (PIL) या प्रकरणाची सीबीआयमार्फत न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, विविध राज्यांकडून स्वतंत्रपणे चौकशा सुरू असल्यामुळे जबाबदारी ठरवण्यात गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्यामुळे अशा घातक सिरपचे बाजारात वितरण थांबत नाही. त्यामुळे देशभरात दूषित औषधांवर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे, ज्यामुळे चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता राहील. केंद्र सरकारला नियामक कमतरता ओळखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक स्थायी तज्ज्ञ मंडळ स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याचिकेत पुढे नमूद केले आहे की, भविष्यात कोणत्याही औषधाची विक्री किंवा निर्यात परवानगी देण्यापूर्वी त्या उत्पादनांचे NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून तपासणी अनिवार्य करावी.
ही घडामोड अशा वेळी घडली आहे, जेव्हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात दूषित कफ सिरप पिल्यानंतर मृत मुलांची संख्या १६ वर पोहोचली आहे. राज्यभरातील मृतांची एकूण संख्या आता १९ झाली असून आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवत आहेत.





