राज्यातील सत्ता नव्या अध्यक्षासाठी पुरक

नगर – जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची वाढीव मुदत 20 जानेवारीला संपणार आहे. नवा अध्यक्ष सर्वसाधारण महिला राहणार असल्याचे आरक्षणातून स्पष्टही झाले आहे; त्यामुळे अनेक इच्छुक सत्ता कुणाची येणार याची औत्सुक्यपूर्ण चौकशी करताना दिसत आहेत. सध्या शालिनी विखे या अध्यक्षा असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर उत्साही असलेला भाजप विधानसभेनंतर तर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाच आमदार पराभूत झाल्याने आणि अशात राज्यात सरकार आले तरी ते टिकणार का यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र होते.
तुलनेत विधानसभेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने बारापैकी आठ जागा जिंकल्याने आघाडी जोमात आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला नव्या समिकरणात शिवसेनेचे पाठबळ मिळाले तर महाविकास आघाडी बाजी मारणार असे चित्र निर्माण होत आहे. परंतु अद्यापही राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अस्पष्ट होत असल्याने जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार हे सध्या तरी सांगणे धाडसाचे होणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर हे सरकार टिकले, तर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपचा अध्यक्ष करणे सोपे जाईल, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे. सध्या भाजपकडून पुन्हा शालिनी विखे व सुनिता खेडकर हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यांचे अनेक मित्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही आहेत; परंतु जर राज्यात दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना असे सरकार बनले तर ते विखे यांच्यासाठी जड जाणार आहे. परंतु भाजप अजित पवार यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाल्यास विखे यांच्यासाठी ते सकारात्मक असेल. असे मानले जात आहे.





