‘नासा’ने नुकतेच कबूल केले आहे की, स्पेस स्टेशन (आयएसएस) मध्ये क्रॅक आणि लीकची संख्या 50 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर या अंतराळवीरांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. गेले साडेपाच महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर महिलेच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून, त्यांचा चेहरा आणि शरीरयष्टी पाहून वजन कमी झाल्याचे जाणवते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत जगणे जिकिरीचे असताना अंतराळातील त्यांचे वास्तव्य आणखी वाढणे त्यांच्या प्रकृतीला धोकादायक ठरू शकते. 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बॅरी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर बोईंग स्टारलायनरच्या चाचणीच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले. त्यांनी जुलैमध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर, त्यांच्या एकमेव पत्रकार परिषदेत लोकांना ते आपल्या कामात व्यस्त आहेत, दुरुस्ती आणि संशोधनात मदत करत आहेत आणि त्यांनी स्टारलाइनरच्या चाचण्यांमधून फलद्रूप असे परिणाम मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचा 13 जून 2024 रोजी परतण्याचा निर्णय झाला होता. पण दुर्दैवाने हे दोघे अंतराळ स्थानकात अडकले आहेत. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर जूनमध्ये बोईंगच्या नवीन स्टारलाइनरवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. तथापि, डॉकिंग करण्यापूर्वी फ्लाइटला हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी झाले. नासाच्या वैज्ञानिकांनी यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दोन्ही अंतराळवीरांना न घेताच यान पृथ्वीवर परतले आणि त्यांचे परतीचे उड्डाण 2025 पर्यंत पुढे ढकलले गेले. त्यांचा आठ दिवसांचा कार्यकाळ आता 2025 पर्यंतच्या अनिश्चित मुक्काम काळात बदलला आहे, ज्यामुळे त्या दोघांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील जीवन धोक्यात आहे. बोईंगने दिलेल्या ग्वाहीनुसार, अंतराळवीर अवकाशात अडकलेले नाहीत आणि त्यांना स्टारलाइनरमध्ये परत आणण्यात कोणताही धोका नाही; परंतु नासाने त्यांना स्पेसएक्स फ्लाइटमध्ये परत आणण्याचा विचार केला. स्पेस एक्स ही एक खासगी स्पेसफ्लाइट कंपनी आहे जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) वर नासा क्रूसह उपग्रह आणि लोकांना अंतराळात पाठवते. स्टारलाइनरसोबत सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांना आणणं रिस्की होतं. त्यामुळे फक्त स्टारलाइनरला पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालं. स्टारलाइनर पृथ्वीवर यशस्वीपणे परतल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनीता अत्यंत भावुक झाल्या होत्या. त्यांनी अंतराळातून खूश असल्याचा मेसेज पाठवला आहे. विल्यम्स यांच्या अंतराळातून आलेल्या अलीकडील प्रतिमा पाहिल्या, तर त्यांचे वजन कमी झाल्याचे जाणवत आहे. अर्थात, ही विस्तारित अंतराळ मोहिमेवरील अंतराळवीरांसाठी एक सामान्य समस्या असते. अंतराळात, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात राहताना शरीराची प्रकृती राखणे आव्हानात्मक असते. अशावेळी शरीर पोषकतत्त्वांचे चयापचय कसे करते आणि ऊर्जेचा वापर कसा करते यावर उत्तम प्रकृती अवलंबून असते. सिएटल येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनय गुप्ता यांनी अलीकडील फोटोंवरून केलेल्या निरीक्षणातून विल्यम्स यांचे गाल काहीसे खोलगट झाल्याचे दिसत होते. हे अनेकदा शरीराचे एकूण वजन कमी झाल्याचे लक्षण असते. यावरून विल्यम्स यांना कॅलरीची कमतरता आहे, हे स्पष्ट होते. शिवाय त्यांच्या शरीरात असलेल्या कॅलरी कमी होत आहेत असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे अंतराळातील त्यांचे वास्तव्य अजून वाढणे हे त्यांच्या प्रकृतीला धोकादायक ठरू शकते. डॉ. विनय गुप्ता म्हणतात की, अंतराळातील वातावरण आणि दबावाखालील आयएसएस केबिन यांनी मानवी शरीरावर मोठा ताण पडतो. अंतराळवीरांना वाढलेल्या उच्च-उंचीवर राहण्याच्या शारीरिक परिणामांचा सामना करावा लागतो. त्यात बदललेल्या वातावरणात हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनमार्ग यांच्या कार्याचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, अंतराळ प्रवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे अंतराळवीरांना होणारे संभाव्य आजार अधिक असुरक्षित बनवतात. डॉ. गुप्ता यांनी ठळकपणे सांगितले की वजन कमी होणे, विशेषत: गालाभोवती, हे दृश्यमान सूचक आहे की अंतराळवीराचे कॅलरी सेवन शरीराच्या वाढीव ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अपुरे असू शकते. अंतराळात पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या अवकाश स्थानकांमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती असते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर स्थानकांमध्ये अक्षरशः तरंगत असतात, अशा परिस्थितीत जगणे अत्यंत जिकिरीचे असते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात हे सर्व सुनीता विल्यम्स यांच्या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच जगभरातील, विशेषतः भारतातील खागोलप्रेमी चिंतेत पडले आहेत.