सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला, नासाने पुढे ढकलली परतीची मोहीम, नक्की कारण काय?

Sunita Williams | अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे मागील अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. या अंतराळवारींना परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासा-स्पेसएक्स क्रू-10 मोहीम आखण्यात आली होती. मात्र, आता ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नासाने दिली आहे. त्यामुळे या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत येण्यास आणखी विलंब होणार आहे.
या मोहिमेत या दोन अंतराळवीरांच्या जागी एक नवीन टीम पाठवण्याचे नियोजन होते. परंतु प्रक्षेपणाच्या चार तास आधी इंजिनिअर्सला रॉकेटच्या एका महत्त्वाच्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये बिघाड असल्याचे आढळले. त्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली.
इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन अंतराळयान या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी तयार होते. क्रू-१० मोहिमेचे उद्दिष्ट चार अंतराळवीरांना आयएसएसमध्ये पाठवणे आणि सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणणे होते.12 मार्च 2025 रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन-9 रॉकेटने प्रक्षेपित होणार होते, परंतु प्रक्षेपण पॅडवरील हायड्रॉलिक्सशी संबंधित समस्येमुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या अगदी आधी, जमिनीवरील हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी करत असताना समस्या आढळळी. ही समस्या जमिनीवरील हायड्रॉलिक सिस्टममध्ये होती, तर रॉकेट आणि अंतराळयान पूर्णपणे ठीक होते, अशी माहिती नासाने दिली आहे.
नासा आणि स्पेसएक्सने नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच ही समस्या सोडवून यान अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी उड्डाण घेईल.
दरम्यान, दोघेही अंतराळवीर जून 2024 मध्ये अवघ्या 8 दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, बोईंगच्या स्टारलायनर यानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ते अंतराळात अडकले. दोघेही जण मागील अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये अडकले आहेत.





