Sunil Shetty: प्लेट धुणाऱ्या वडिलांचा मुलगा आज करोडपती स्टार; विकत घेतले वडिलांचे जुने हॉटेल

Sunil Shetty: सुनील शेट्टी यांच्या आयुष्यातला संघर्ष आणि यशाची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातल्या मुल्की या छोट्या शहरात झाला. ते तुलू भाषिक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले.
त्यांचे वडील वीरप्पा शेट्टी नोकरीच्या शोधात मुंबईत आले आणि जुहू येथील एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले. टेबल पुसणे, प्लेट धुणे, जेवण वाढणे अशा कामांत त्यांनी खूप मेहनत घेतली. सुनील लहान असतानाच वडिलांचा हा संघर्ष त्यांनी जवळून पाहिला.
बॉलीवूडमध्ये नाव कमावल्यानंतर सुनील शेट्टींनी त्याच हॉटेलची इमारत विकत घेतली जिथे त्यांच्या वडिलांनी काम केले होते. २०१३ मध्ये एका शो-रूमच्या उद्घाटनावेळी त्यांनी सांगितले की, “हीच ती जागा जिथे माझे वडील प्लेट स्वच्छ करायचे.”
लहानपणी ते शूटिंग बघायला जात असत. एकदा अमिताभ बच्चन आणि जीनत अमान यांच्या ‘डॉन’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी गार्डने त्यांना थांबवले, पण अमिताभ यांनी त्यांना आत बोलावले आणि नंबरही दिला. मात्र सुनील यांनी कधी फोन केला नाही.
सुनील शेट्टी यांनी १९९२ मध्ये बलवान चित्रपटातून पदार्पण केले. ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘हेरा फेरी’, ‘धडकन’, ‘मैं हूं ना’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या . अॅक्शन हिरो, खलनायकआणि विनोदी रोल्समध्ये ते चमकले. हिंदीसोबतच मलयाळम, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले.
अभिनयासोबतच त्यांनी निर्माता म्हणूनही काम केले आणि ‘रक्त’, ‘खेल’, ‘भागम भाग’, ‘लूट’ यांसारखे चित्रपट निर्माण केले. अलीकडे ‘धारावी बँक’ आणि ‘हंटर’ या वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.
२५ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी माना शेट्टी (मूळ नाव मोनिशा कादरी) यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगी अथिया आणि मुलगा अहान, दोघेही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.
सुनील शेट्टींची ही कहाणी सांगते की मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाप्रती आदर यामुळे मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात.





