Sunil Pal : समय रैनाच्या सन्मानावर सुनील पाल संतापला; म्हणाला, ‘घोर कलियुग… हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे?’ व्हिडिओ पाहा
Sunil Pal : “घोर कलियुग ..घोर कलियुग.. हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे, इंदिराजी सगळं पहात आहेत, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Sunil Pal : नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनाचा सन्मान करण्यात आला. या सन्मानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेता सुनील पालने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे. “घोर कलियुग ..घोर कलियुग.. हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे, इंदिराजी सगळं पहात आहेत, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्र सायबर ॲन्थममधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने अनेक सेलिब्रिटींचा सन्मान केला. यात समय रैनाचाही समावेश होता. यावरुन अभिनेता सुनील पाल याने व्हिडिओत आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘मित्रांनो आज मी शूटिंग करत आहे. आणि मला अशी बातमी मिळाली, महाराष्ट्र सरकारने समय रैनाला सन्मानित केलं. घोर कलियुग आलं, घोर कलियुग. तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे त्याचा सन्मान करताय, हे तरी सांगा.. असा सवाल राज्य सरकारला सुनील पाल याने केला आहे.
घोर कलियुग ..घोर कलियुग..
पुढे तो म्हणाला, तो शिवीगाळ करतो. लेटंटसारखा शो आणतो, ज्यात सहभागी होणारे ही शिव्या देतात. पॅनलही शिवीगाळ करतं. अशा शिव्या दिल्या जातात, ज्या तुम्हाला ऐकवणारही नाही. अशा माणसाचा तुम्ही सन्मान केला. आता कॉमेडीमध्ये येणारे नवे कलाकार, तरुण यांच्यापर्यंत काय संदेश पोहोचणार? सन्मान हवा असेल तर आधी कॉमेडियन बना, शिवीगाळ करा, पोलीस केस करून घ्या, तुमच्या भोवती असा वाद निर्माण करा की तुम्हाला मारत मारत पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल; न्यूजमध्ये या मग तुमचा शो एकदम हिट शो म्हणून बाहेर येईल. जेव्हा तुम्हाला यश मिळेल, तेव्हा तुम्हाला सगळेजण सलाम करतील. जे पोलीस तुम्हाला मारत होते ते तुमची सुरक्षा करतील. जे सरकार तुमच्या विरोधात होतं ते तुमचा सन्मान करेल.’ व्हिडिओच्या शेवटी सुनील पाल याने’ घोर कलियुग ..घोर कलियुग.. हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे, इंदिराजी सगळं पहात आहेत असे म्हटले आहे.
View this post on Instagram
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वाद
समय रैनाच्या लोकप्रिय डिजिटल शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका एपिसोडवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि इतर काही कलाकारांनी दिव्यांग व्यक्ती, अंध व्यक्ती तसेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA) सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त बालकांबाबत कथितपणे आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणानंतर मोठा गदारोळ झाला होता. मात्र, सध्या कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना यांच्याविरोधात कोणताही गुन्हा प्रलंबित नसल्याचे सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर आणि संबंधित गुन्हेगारी खटले रद्द केले आहेत.





