सचिनशी संवाद साध आणि चुका दुरुस्त कर

जोहान्सबर्ग – फलंदाजी करताना खूप चुका होत आहेत. पायही हलत नाही व ते चेंडूपर्यंतच पोहोचत नाही. ड्राईव्ह मारतानाही खूप चुक होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर सचिन तेंडुलकरशी संपर्क साध, त्याच्याशी बोल व त्याची मदत घे, असा सल्ला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला दिला आहे.
गेल्या दोन वर्षांत एकही मोठी खेळी झालेली नाही. यापूर्वी कोणत्याही संघाविरुद्ध, कोणत्याही खेळपट्टीवर कोहली सातत्याने यशस्वी होत होता. मात्र, त्यानंतर तो त्याच चुका सातत्याने करत आहे. ड्राईव्ह करताना तो चेंडूचा अभ्यासही करत नसल्याचे जाणवते.
त्याने मारलेले ड्राईव्ज हवेत जात आहेत. ते ग्राउंड होणे महत्वाचे असते अन्यथा तो झेल होतो. ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर तो यष्टीमागे बाद होत आहे. याबाबत त्याचे तंत्र चुकत आहे. म्हणूनच त्याने सचिनशी बोलायला हवे, असेही गावसकर म्हणाले.
स्विंगर तसेच आऊट कटर्स चेंडू खेळण्यापूर्वी त्याने नेटमध्ये याचा सराव केला पाहीजे. कोहलीने संघातील वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर याचा सराव करणे योग्य ठरेल. सचिन देखील अशा पद्धतीने बाद झाला होता. मात्र, त्यानंतर त्याने काही सामन्यांत ऑफ स्टम्पच्या बाहेर जात असलेल्या चेंडू सोडून देण्याचे तंत्र अवलंबले व तो प्रचंड यशस्वी ठरला. तोच आता कोहलीला सल्ला देऊ शकतो, असेही गावसकर म्हणाले.





