satara | आरोग्यदायी खाद्यतेलासाठी सूर्यफूल लागवड गरजेची

नागठाणे, (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी लाकडी तेल घाण्यावरून सूर्यफुलाचे गाळप करून शेतकऱ्यांनी स्वतःचे तेल वर्षभर खावे. यासाठीच सूर्यफुल लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
अतीत येथील सूर्यफुल प्रकल्प लागवडीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, सरपंच चंद्रकांत यादव, उपसरपंच वंदना कणसे, माजी सरपंच तानाजी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सौ. फरांदे म्हणाल्या, “आजकाल रिफाइंड तेलाच्या अतिरेकी वापरामुळे हृदयरोग, बीपी, कोलेस्ट्रॉल, वजन वाढणे इत्यादी घातक आजार वाढत आहेत.
त्यावर उपाय म्हणून कृषी विभाग जिल्ह्यात 120 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड करून शेतकऱ्यांना स्वतःचे तेल आहारात घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. सूर्यफुलाच्या लागवडीमुळे मधमाशांचे प्रमाण वाढते.
त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधत परागीभवन वाढल्याने परिसरातील सोयाबीन तसेच भुईमूग व खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच सूर्यफुलाचा पक्षी थांबा म्हणून उपयोग झाल्याने कीड रोगाचे नियंत्रण पण होते. त्यामुळे सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून सूर्यफूल लागवडीकडे पाहणे गरजेचे आहे. ”
या प्रक्षेत्र भेटीमध्ये त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत सपना संतोष जाधव यांच्या पापड गृह उद्योगाला भेट देऊन पॅकिंग तसेच विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. निसराळे येथील भगवान गायकवाड यांचे ऊस सुपर केन नर्सरी व आले पिकाची सुपर जिंजर नर्सरी, मधुमक्षिका पालन या नावीन्यपूर्ण प्रयोगांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.
रामकृष्णनगर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत धनाजी बापूसो काळभोर यांची कागदी लिंबू लागवड भाग्यश्री फरांदे यांचे हस्ते करण्यात आली.
काशीळ येथील संदीप मारुती फाळके यांच्या ड्रॅगन फ्रुटची पाहणी त्यांनी केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक अनिल यादव, रोहिदास तिटकारे, कृषी सहाय्यक सुनीता पोतेकर, दया कांबळे, प्रगतशील शेतकरी विजय पाटील, समृद्धी बाबा जाधव, श्रीमंत घोरपडे, पंढरीनाथ घोरपडे, अधिक रंधवे, संतोष काळभोर उपस्थित होते. कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी सूत्रसंचालन केले.





