Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होऊन आज या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली असून, सुरुवातीपासून सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. आता पहिल्या तीन फेऱ्यांचे कल हाती आले असून, यामध्ये तब्बल 26773 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. पहिल्या फेरीच्या निकालानंतर सुनेत्रा पवार 6,500 मतांनी आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आला असून सुनेत्रा पवारांनी ही आघाडी वाढवत 16,543 मतांपर्यंत नेली आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीअखेर 26773 आघाडीवर आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी त्या किती मतांचे लीड घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल मतमोजणीला सुरुवात होताच सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी स्वतः मतमोजणी केंद्रावर उपस्थिती लावली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून बारामतीत विजयाचा जल्लोष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.