DCM Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार असा प्रश्न पडला होता. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार असून त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता मुंबईत मंत्री म्ह्णून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या राज्याच्या १३ व्या उपमुख्यमंत्री असून, त्यांच्या रुपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वतः सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांचा सामाजिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे. अजित पवार यांनी देखील त्यांच्या अनेक भाषणांमध्ये सुनेत्रा पवारांची त्यांच्या जीवनात मोलाची साथ लाभली असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. सुनेत्रा पवार यांची ओळख १८ अॅाक्टोबर १९६३ या दिवशी सुनेत्रा पवार यांचा धाराशिव या ठिकाणी जन्म झाला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे मंत्री होते. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला आहे. लग्नानंतर सामाजिक कार्याला झोकून दिले १९८५ मध्ये सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळे सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली. ग्रामस्वच्छता अभियानात महत्वाची भूमिका विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कामात स्वतः वाहून देऊन काम केले. त्या पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत. त्यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केले. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाला. यात सुनेत्रा पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विविध उपक्रम राबविले याशिवाय सुनेत्रा पवार यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती या अत्यंत महत्वाच्या अशा उपक्रमाद्वारे जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम राबवला. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण आदी उपक्रम राबवत मोलाचे कार्य केले. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला. अजित पवारांच्या राजकीय वाटचालीत मोलाची साथ लग्नानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामं सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत सुनेत्रा पवारांनी त्यांना मोलाची साथ दिली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम होणार आहे. राज्यसभेवर खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्विकारवा लागला आणि सुप्रिया सुळे पुन्हा खासदार बनल्या. पण पराभव वाट्याला आला म्हणून सुनेत्रा पवार खचल्या नाहीत. त्या जनसेवेत पुन्हा त्याच जोमाने सक्रिय झाल्या. त्यानंतर राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली आणि त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. ही दोन महत्वाची खाती मिळणार? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट घेतली. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव नेत्यांंकडून मांडण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. आता मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर आणखी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही दोन महत्वाची खाती त्यांना मिळू शकतात. तर अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त आणि नियोजन हे खाते भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा आहे.