मंचर : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मंगळवारी मुंबई येथे सत्कार करण्यात आला. पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दमदार कामगिरी करत विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय निवासस्थानी हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील व दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास विकासकामांद्वारे सार्थ ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांनीही या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.