Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर अखेर तोडगा निघताना दिसत आहे. अजित पवारांच्या पश्चात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार स्वीकारण्यास तयार झाल्या असून, त्यांचा शपथविधी शनिवारी सायंकाळी पार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या प्रचार आणि जाहिरात व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. पक्षातील आग्रहानंतर निर्णय अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे, अशी मागणी पक्षातील अनेक नेत्यांकडून होत होती. तसेच पक्षप्रमुखपदाची धुरा देखील त्यांच्याकडेच द्यावी, यासाठी हालचाली सुरू होत्या. अखेर पक्षाच्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिल्याची माहिती आहे. विधीमंडळ गटनेतेपदावर शिक्कामोर्तब सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांच्या अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या पाच वरिष्ठ नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक झाली. याच बैठकीत उपमुख्यमंत्रिपद आणि विधीमंडळ गटनेतेपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून, त्यानंतर शपथविधीची औपचारिक घोषणा होईल. अर्थखात्यावरून राष्ट्रवादीची आग्रही भूमिका दरम्यान, अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कुणाकडे सोपवायची, यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादीकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल 45 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती आहे. Sunetra Pawar पक्षप्रमुखपदही सुनेत्रा पवारांकडे? अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीकडे पक्षाची धुरा असावी, असे मत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.