Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर शुक्रवारी सावडण्याचा विधी पार पडला. या शोकाकुल वातावरणातच राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या घडामोडींच्या केंद्रस्थानी आता सुनेत्रा अजित पवार यांचे नाव आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी होकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसंदर्भातील निरोप घेऊन नरेश अरोरा मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे उद्या (शनिवार) सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता बळावली असून, राज्याच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. Sunetra Pawar अजित पवार यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली प्रशासकीय आणि राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना या निर्णयामुळे आणखी चालना मिळाली आहे. दरम्यान, पुढील काही तासांत राजकीय पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता असून, सर्वांचे लक्ष उद्याच्या संभाव्य शपथविधीकडे लागले आहे.