बारामती लोकसभा मतदार संघातील पराभवानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेसाठी संधी; उमेदवारी अर्ज केला दाखल

Sunetra Pawar| बारामती लोकसभा मतदार संघातील पराभवानंतर अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी दिली आहे. आज सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | Sunetra Pawar, NCP leader and wife of Maharashtra Deputy CM Ajit Pawar files her nomination for the Rajya Sabha by-elections. pic.twitter.com/vJmfjesKYp
— ANI (@ANI) June 13, 2024
राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज विधानभवनात दाखल होत उमेदवारी अर्ज भरला. या जागेसाठी पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा होती. अखेर यात सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. आज याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि इतर मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत विचाराअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे हा सर्वानुमते निर्णय झाला आहे. पक्षात सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करायच्या असतात. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात.” तसेच यावेळी भुजबळ यांनी नाराज नसल्याचे देखील म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, “या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हे देखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हते.” दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघासाठी देखील भुजबळ इच्छुक होते. मात्र येथेही त्यांना संधी मिळाली नव्हती.
सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात होत्या. पण बारामतीत त्यांचा पराभव झाला. नंदन-भावजय यांच्यातील ही लढत राज्यात चांगलीच चर्चेत राहिली होती.





