– पराग पोतदार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि एक बहुआयामी विचारशील व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारे डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा “पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन आज रविवारी, दि. 23 जुलै रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. नाटक आणि चित्रपट या दोन्हीमध्ये सातत्याने कार्यरत राहून बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची वाटचाल तितकीच कर्तृत्वसंपन्न आहे. त्यांच्या वाटचालीचा यानिमित्ताने घेतलेला हा वेध. डॉ. मोहन आगाशे हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती किमान पुण्याच्या क्षितीजावर तरी नक्कीच नसावी. कारण आपल्या अभिनयसामर्थ्यातून त्यांनी नाटक आणि चित्रपटांतून अभिनयाचा एक वेगळा दमदार ठसा कायमच उमटवलेला आहे. रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते, नावाजलेले मानसोपचार तज्ज्ञ आणि नाट्य चळवळीतील समर्पित साधक अशी त्यांची ओळख सर्वत्र आहे. डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म झाला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून 1970 साली त्यांनी एम.बी.बी.एस. केले. पुढे त्यांनी मानसशास्त्रीय वैद्यकशास्त्रातही पदविका घेतली आणि त्याहीपुढे जाऊन डॉक्टर ऑफ मेडिसीन इन सायकॅट्री (एम.डी.) ही पदवी 1978 साली संपादन केली. त्यानंतर खरे तर ते या एकाच क्षेत्रामध्ये स्वत:ला झोकून देऊन उत्तम कारकीर्द घडवू शकले असते; पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे एकीकडे आपली मानसोपचार तज्ज्ञ ही ओळख मिटू न देता त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातही उत्तुंग असे कार्य केले. त्यांचे अभिनयाशी आणि रंगभूमीशी नाते अगदी बालपणापासूनच जोडले गेलेले होते. सई परांजपे यांच्या बालनाट्यांतून काम करीत त्यांनी सुरुवात केली. पुढे ही अभिनयाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. पुरुषोत्तम करंडकामध्ये त्यांनी एकांकिका गाजवल्या आणि त्यांच्या अभिनयाची चुणूक दिसून आली. पुढे त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. “डाकघर’, “धन्य मी कृतार्थ मी’ यासारख्या नाटकांतून त्यांनी कामे केली. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या “घाशीराम कोतवाल’चा प्रयोग रंगभूमीवर आणताना नाना फडणवीस यांच्या भूमिकेसाठी जब्बार पटेल यांनी डॉ. मोहन आगाशे यांची निवड केली आणि ती निवड किती सार्थ होती हे डॉ. आगाशे यांनी त्यांच्या भूमिकेतून दाखवून दिले. त्या नाटकाने त्यांना एक वेगळीच ओळख मिळवून दिली. या नंतरच्या काळातही त्यांनी “तीन चोक तेरा’, “सावर रे’, “तीन पैशांचा तमाशा’, “बेगम बर्वे’ अशा विविध नाटकांतून काम केले. “काटकोन त्रिकोण’ नाटकातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. त्याचे 250 हून अधिक यशस्वी प्रयोग डॉ. आगाशे यांनी केले. नाट्यक्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर डॉ. आगाशे यांची पावले चित्रपटांकडे वळली. तिथेही तितक्याच समर्थपणाने त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या “सामना’ या गाजलेल्या चित्रपटात मारुती कांबळेची छोटी पण प्रभावी भूमिका डॉ. आगाशे यांनी सादर केली आणि आजही ती मराठी रसिकांच्या स्मरणात आहे. त्यांची अशीच एक भूमिका लोकांच्या चिरकाळ स्मरणात राहिली ती “जैत रे जैत’मधील नाग्याची भूमिका. या चित्रपटाने डॉ. आगाशे यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. “सिंहासन’ या पुढच्या चित्रपटात त्यांनी साकारलेला “बुधाजीराव’सुद्धा लोकांच्या स्मरणात राहिला. ही भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण अशीच ठरली. “एक होता विदूषक’ चित्रपटातील रगेल असा हिंमतराव इनामदार असो किंवा मैत्रीचा गाभा सांगणारा “कथा दोन गणपतरावांची’ हा चित्रपट असो त्यात डॉ. आगाशे यांचे अभिनयसामर्थ्य किती प्रगल्भ आणि विलक्षण आहे हे दिसून आले. याशिवाय, “देवराई’, “काय द्याचं बोला’, “वळू’, “विहीर’, “देऊळ’, “कासव’ अशा चित्रपटांतील त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्णच ठरली. याखेरीज हिंदी चित्रपटसृष्टीतही तितक्याच समर्थपणाने त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. “भूमिका’, “मंथन’, “निशांत’, “गजगामिनी’, “अब तक छप्पन’ असे अनेकानेक उत्तमोत्तम हिंदी चित्रपट त्यांनी साकारले आणि तिथेही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. हे सारे काम करताना त्यांनी अभिनयाचा पाया घडवणाऱ्या बालरंगभूमीकडे दुर्लक्ष केले नाही व मुलांसाठी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले. डॉ. आगाशे यांच्या आजवरच्या देदीप्यमान वाटचालीसाठी त्यांना अनेकानेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यांनी बारामती येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे. अशा या बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा “पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान होतो आहे ही तमान पुणेकरांसाठी अर्थातच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.