– अपर्णा देवकर कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर काकणभर चढ ठरणारी कामगिरी केल्याचे अनेक दाखले इतिहासाच्या पानांवर आढळतात. आजही ही परंपरा सुरू असून गीतिका श्रीवास्तव यांच्या रूपाने त्यामध्ये एक नवे पान जोडले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास आला. भारताकडे जगातील सर्वांत मोठे संविधान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवून सन्मान मिळवला. दर्जेदार शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिकदृष्ट्या स्वत:ला बळकट केले नाही तर काही विशिष्ट पदांवर राहून आपले कौशल्य सिद्ध केले. उद्योग, व्यवसाय, बॅंकिंग सेवा आणि डिजिटलायझेशनच्या युगात महिलांनी स्वत:ला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. भारतात महिलांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान, राष्ट्रपती अशी महत्त्वाची आणि सन्मानाची पदे भूषवली आहेत. इतिहासात डोकावल्यास झाशीची राणी लक्ष्मीबाई ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत महिलांनी समाजात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनाची उदाहरणे घालून दिली. भारतीय मुलींनी क्रीडा क्षेत्रातही जगाला चकित केले आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांत सांगायचे तर, भारतीय महिला ऊर्जा, दूरदृष्टी, चैतन्यशील उत्साह आणि वचनबद्धतेने सर्व आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहेत. आपल्यासाठी महिला या केवळ घराचा प्रकाशच नाहीत तर या प्रकाशाची ज्योतही आहेत. अनादी काळापासून स्त्रिया मानवासाठी प्रेरणास्रोत आहेत. भारतीय महिलांनी सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अलीकडेच आता परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या गीतिका श्रीवास्तव यांची पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गीतिका श्रीवास्तव या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील भारतीय मिशनच्या प्रमुख म्हणून विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला असतील. 1947 मध्ये श्री प्रकाश यांना तत्कालीन पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त म्हणून पाठवण्यात आले होते. तेव्हापासून नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व नेहमीच पुरुष उमेदवारांनीच केले आहे. इस्लामाबादमधील शेवटचे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया होते. 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांचा दर्जा कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिसारिया यांना माघारी बोलावण्यात आले. पाकिस्तानमध्ये याआधीही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना कोणताही प्रभार दिला नाही. सर्वोच्च स्तरावर महिलेची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानचा एकूण इतिहास आणि वर्तमान स्थिती पाहता या पदाची धुरा सांभाळणे हे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक आहे. इस्लामाबादला काही वर्षांपूर्वी भारतीय राजदूतांसाठी नॉन-फॅमिली पोस्टिंग म्हणून घोषित करण्यात आले होते. यामुळे सामान्यतः महिला अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येत नव्हते. पाकिस्तानात बेनझीर भुट्टो यांनी पंतप्रधानपद भूषवलेले असले आणि नवाझ कुटुंबातील किंवा इतर प्रभावशाली घराण्यातील महिलाही राजकारणात असल्या, तरी तिथे अजूनही महिलांना समाजात पाहिजे तितका मान मिळत नाही. गीतिका श्रीवास्तव यांना विदेश सेवेचा बराच अनुभव आहे. गीतिका श्रीवास्तव 2005 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या गीतिका परराष्ट्र मंत्रालयाच्या इंडो-पॅसिफिक विभागात सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. त्या अस्खलित चिनी (मंडारीन भाषा) बोलतात. 2007 ते 2009 दरम्यान श्रीवास्तव यांनी चीनमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावासातही काम पाहिलं होतं. याशिवाय कोलकाता येथील स्थानिक पारपत्र कार्यालयातही त्या सेवेत होत्या. तेथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या द इंडियन ओशन रिजन डिव्हिजन विभागात संचालक म्हणून काम केले आहे. आता गीतिका श्रीवास्तव इस्लामाबादमध्ये भारताच्या पूर्णवेळ उपायुक्त असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आजही तणावग्रस्त असताना त्यांची नियुक्ती झाली आहे. दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होत नाहीये आणि व्यापारही ठप्प आहे. टेरर अँड टॉक म्हणजेच दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासात मुत्सद्देगिरीमध्ये महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुषमा स्वराज यांच्यासारख्या अभ्यासू महिलेने परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असताना संयुक्त राष्ट्रसंघासह अन्य सर्वच व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील भूमिकांना कडाडून विरोध केलेला जगाने पाहिला आहे. कालोघात राजनैतिक प्रयत्न आणि वाटाघाटींमध्ये महिलांचा समावेश करण्याचे महत्त्व वाढत आहे. गीतिका श्रीवास्तव उभय देशांमधील गुंतागुंतीचे संबंध सोडवण्यामध्ये अधिक प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा आहे. त्या पाकिस्तानमध्ये भारताचा आवाज बनतील. पाकिस्तानने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे नवे प्रभारी म्हणून साद वरियाच यांचीही नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा होणार का, हे पाहणे औचित्याचे ठरेल.