अशोक सुतार
स्पेन येथील वेलेन्सिया शहराजवळील ब्युनोल येथे दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या बुधवारी जगप्रसिद्ध टोमॅटो महोत्सव साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही संगीत, विविध मनोरंजक कार्यक्रम पाहू शकता आणि एकमेकांवर टोमॅटो फेकू शकता आणि उत्सवाचा आनंद लुटू शकता. या उत्सवाला ला टोमॅटिना उत्सव म्हटले जाते. टोमॅटोला समर्पित हा उत्सव आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक ब्युनोल शहरात येतात. ला टोमॅटिना हा सण पूर्व स्पेनच्या पूर्वेकडील वॅलेन्सीयन शहरापासून 30 किमी अंतरावर ब्युनोल येथे साजरा केला जातो.
ला टोमॅटिना महोत्सवाची सुरुवात 1945 मध्ये झाली. काही तरुणांनी प्रौढांसमवेत शहरातील चौकात खेळ खेळण्याचे ठरवले. चौकात सुरू असणाऱ्या या खेळात सहभागी झाल्यानंतर एक मुलगा पडला आणि त्याला जखम झाली. त्यानंतर दोन गटात वाद सुरू झाला. तिथे जवळच भाजीपाला मार्केट होते. गर्दीमधील काही जणांनी बाजारातील टोमॅटो एकमेकांना फेकून मारण्यास सुरुवात केली. एकप्रकारचे टोमॅटो युद्धच सुरू झाले. पुढील वर्षापासून तरुणांनी घरून टोमॅटो आणले आणि पुन्हा दोन गटांत टोमॅटो युद्ध सुरू झाले. त्या वर्षापासून ही परंपरा सुरू झाली आहे.
1957 साली हा उत्सव रद्द करण्यात आला होता. त्यावेळी लोकांनी निषेध म्हणून टोमॅटो चिन्हाचे दफन केले. रहिवाशांनी प्रचंड टोमॅटो ठेवलेली शवपेटी घेतली. या परेडसमवेत म्युझिक बॅंड होता. निषेध यशस्वी झाला. अखेर ला टोमॅटिना महोत्सवाला परवानगी देण्यात आली आणि अधिकृत महोत्सव झाला.
इन्फोर्म सेमॅनल या स्पॅनिश टीव्हीने या टोमॅटो महोत्सवाला सर्वत्र पोहोचवले. त्यानंतर सहभागींची संख्या वाढू लागली. 2002 मध्ये, ला टोमॅटिना महोत्सवाला प्रचंड यश मिळाल्यामुळे पर्यटन विभागाच्या सचिवांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आवडीचा उत्सव म्हणून घोषित केले. 2015 साली अंदाजे 1,45,000 किलो टोमॅटो या महोत्सवासाठी वापरण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी होताना भांडणे, कठीण वस्तूंचा वापर या गोष्टी वर्ज्य आहेत. स्पेनच्या या टोमॅटो महोत्सवाची प्रेरणा घेऊन चीन, अमेरिका इ. देशांत अशा प्रकारचा महोत्सव सुरू करण्यात आला आहे.
भारतात काही आयोजकांनी बेंगळुरू आणि म्हैसूर येथे टोमॅटो महोत्सवाचे आयोजन केले होते. परंतु कर्नाटक सरकारने या महोत्सवाला परवानगी दिली नाही. तसेच दिल्लीतही आयोजकांना यश मिळाले नाही. मात्र, स्पेनमधील टोमॅटो महोत्सव जगभर लोकप्रिय होत आहे.