‘सूर्यनारायण तापले’; नागरिकांनो सावधान…!

उन्हात आरोग्य सांभाळा : उष्माघाताचा धोका वाढला

पुणे – यंदा मार्च महिन्यातच सूर्यनारायण तापल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मागील दहा दिवसांपासून पारा चाळीशीच्या पुढे गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान…! या असह्य करणाऱ्या उन्हामध्ये बाहेर न पडाल तेवढच बरे, शक्‍य नसल्यास डोक्‍यात टोपी, गॉगल आणि पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालूनच बाहेर पडावे. विशेष खबरदारी म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असलेले अती थंड पेय पिण्याचे टाळावे.

एप्रिल आणि मे महिना कडक उन्हाळ्याचे, परंतु यावर्षी मार्च महिन्यापासूनच चटके सोशवे लागत आहेत. मागील दहा दिवसांपासून शहरातील कमाल तापमान 41 अंशापर्यंत जावून पोहचले असून, हंगामाती सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारी रस्तेही शांत झाले आहेत. दरम्यान, हा असह्य उन्हाचा चटका “घात’ करू शकतो, त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करून उष्माघाताचा बळी जाण्याची भीती आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.

विशेषत: लहान मुले आणि वृध्द व्यक्तींना उन्हामध्ये पाठवू नये, पाणी जास्त प्यायला द्यावे, आहार हलका आणि पौष्टीक असावा. उन्हामुळे शरिरातील पाणी कमी झाल्याने चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्यावर भोवळ, छातीत दुखणे अशा घटना घडतात. त्यामुळे शक्‍यतो अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ सावलीमध्ये शांत बसावे. त्यानंतर थोडे-थोडे पाणी पिऊन आराम करावा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

उन्हामध्ये जाताना घ्यावयाची काळजी
* आवश्‍यकता नसल्यास दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे
* घराबाहेर पडण्याच्या अर्धातासआधी पुरेसे पाणी प्यावे
* हृदयरोग, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी उन्हामध्ये जावू नये

उन्हातून सावलीत आल्यावर हे करू नये
* उन्हातून सावलीत किंवा घरी आल्यावर त्वरीत थंड पाणी पिऊ नये
* पाणी गटागटा आणि उभे राहू पियु नये
* तेलकट आणि उष्ण पदार्थ खाणे टाळावे
* उन्हातून घरात आल्यावर चिडचिड न करता दहा मिनिटे शांत डोळे मिटून बसावे
* डोळे, तोंड गरम पाण्याने न धुता थोडे गार असलेल्या पाण्याने धुवावे

थंड पेय पिताना काळजी घ्या
उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबत, निरा, कोकम, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस यासह कोल्ड्रींग, आईस्क्रीम इत्यादी थंड पेय आणि पदार्थाला मोठी मागणी वाढते. उन्हाने तापलेले डोके थंड करण्यासाठी रस्त्यामध्येच थांबून नागरिक थंड पेय पिताना दिसतात. परंतु, नागरिकांनो सावधान, तुम्ही पित असलेले थंड पेय खरच शुध्द आणि आरोग्यासाठी चांगले आहे का? कारण, उन्हातून सावलीत आल्यावर थंड पेय पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच थंड पेयामध्ये वापरण्यात येणारा बर्फ शुध्द आहे का याची खबरदारी घ्यावी. दरम्यान, अशुध्द बर्फ आणि कडक उन्हामध्ये थंड पेयपिल्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होण्याची भीती आहे.

टोपी, गॉगल्स, स्कार्पला मागणी वाढली
उन्हाच्या वाढत्या चटक्‍याने डोकी तापायला लागली आहेत. त्यामुळे टोप्या, स्कार्प, गॉगल घेण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. त्यामध्ये टोपीमध्ये फॅन असलेली आणि वाळ्याच्या टोप्याही अनेक ठिकाणी दिसत आहे. परंतु, कॉटनच्या टोप्या घेण्यावर नागरिकांचा कल आहे. दरम्यान, साध्या गॉगलमुळे डोळे जळजळ करणे, दुखणे अशाप्रकारचे त्रास होवू शकतात. त्यामुळे शक्‍यतो चांगल्या दर्जाचे गॉगल किंवा हेल्मेट घ्यावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.