‘7,640 कोटी रुपये द्यायला तयार…’, सुकेशचे थेट जेलमधून निर्मला सीतारामन यांना पत्र

Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman: कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्याने 2024-2025 या वर्षातील त्याचे परदेशी उत्पन्न जाहीर केले आहे. तसेच कर भरण्याचीही तयारी दर्शवली.
सुकेशवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून त्याच्याविरोधात 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच आता निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून सुकेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात सुकेशने खुलासा केला की, अमेरिकेतील नेवाडा येथे एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि ब्रिटीश व्हर्जिन आयलंड येथे स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन या व्यवसायांची नोंदणी केली आहे. हे व्यवसाय 2016 पासून सुरू असून, 2024 मध्ये त्याचा व्यवसाय 2.70 अब्ज डॉलर एवढा होता.
याशिवाय, अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्येही त्याचा व्यवसाय सक्रीय आहे. कर वसुलीची सर्व प्रकरणे निकाली काढण्यास देखील तयार असल्याचे त्याने आपल्या पत्रात म्हटले आहे.
सुकेशने पत्रात म्हटले की, वर्ष 2024 मधील त्यांच्या परदेशी उत्पन्नावर 7,640 कोटी रुपयांचा कर भरण्यास तयार आहे. तसेच, भारतातील तंत्रज्ञान आणि प्रगत ऑनलाइन कौशल्य गेमिंग व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करण्याची देखील इच्छा आहे.
दरम्यान, सुकेशवर खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतही त्याचे नाव जोडले गेले. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, जॅकलिनने हे सर्व आरोप वारंवार फेटाळले आहेत.





