मुंबई : मुंबईतील कोविड-१९ जम्बो सेंटर घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय, उद्योगपती सुजीत पाटकर यांना अखेर उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. याप्रकरणी दाखल मूळ गुन्ह्यात पाटकर यांना आधीच जामीन मंजूर झाल्याने उच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे. सक्त वसुली संचालनालयाने या प्रकरणी दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी पाटकर यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने या याचिकेवर गेल्या आठवड्यात सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. एकलपीठाने बुधवारी याप्रकरणी निर्णय देताना पाटकर यांना एक लाख रूपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. दरम्यान, पाटकर यांना जुलै २०२३ मध्ये ईडीने अटक केली होती. त्यांच्यासह इतर आरोपींनी कोविड-१९ जम्बो सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमी नियुक्ती करून बीएमसीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. पाटकर हे लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांपैकी एक होते, ज्यांना वरळीमध्ये कोविड-१९ जम्बो सेंटर चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने पाटकर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.