Nagar politics : गडाख-विखे भेटीवर सुजय विखे पाटील यांचा खुलासा; ‘राजकीय विरोधक, कौटुंबिक विरोधक नाहीत’
Nagar politics : यशवंतराव गडाख यांच्या भेटीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खुलासा केला. ‘गडाख राजकीय विरोधक असले तरी कौटुंबिक विरोधक नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Nagar politics : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच नगर येथील विरंगुळा बंगल्यावर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गडाख-विखे भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भेटीबाबत जाहीर खुलासा केला आहे.
“माननीय गडाख साहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राजकीय विरोधक आहेत, इथपर्यंत ठीक आहे; मात्र ते कौटुंबिक विरोधक नाहीत. ते माझे नातेवाईकही आहेत. त्यामुळे त्यांची झालेली ही काही पहिलीच भेट नाही,” असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
नातेवाईकांच्या घरी जाण्यात गैर काहीच नसल्याचे सांगत त्यांनी या भेटीमागील कौटुंबिक नातेही स्पष्ट केले. “शंकरराव गडाख यांचा सख्खा भाचा हा माझा सख्खा साडू आहे. आम्ही दोन वेगवेगळ्या पक्षांत असलो, तरी ते माझे नातेवाईक आहेत. त्यामुळे या भेटीला राजकीय तर्कवितर्क लावणे संयुक्तिक नाही,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणामुळे भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा कायम आहे. विशेषतः जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली का, की भविष्यातील राजकीय घडामोडींची ही नांदी आहे, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
गडाख आणि विखे हे राजकीयदृष्ट्या विरोधी गटात असले, तरी कौटुंबिक संबंध वेगळे असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, दोन प्रमुख राजकीय कुटुंबांतील नेत्यांच्या या भेटीमुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावर चर्चांना उधाण आले आहे.





