मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी 16 जागांवर उमेदवार न उभा करण्यामागचं कारण स्पष्ट करत काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकूण 62 जागा दिल्या होत्या. मात्र, ऐनवेळी वंचितने त्यापैकी 16 जागांवर उमेदवार न उभा करता त्या जागा पुन्हा काँग्रेसकडे सोपवल्या. मात्र काँग्रेसलाही त्या जागांवर उमेदवार देता न आल्याने या मतदारसंघांमध्ये आता भाजप-शिवसेना युती, मनसे आणि ठाकरे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर? काँग्रेसच्या हेकेखोरपणामुळेच आम्ही 16 जागांवर उमेदवार दिले नाहीत. ज्या जागा आम्हाला हव्या होत्या, त्या काँग्रेसने नाकारल्या. एका मोठ्या काँग्रेस नेत्याच्या घरातील 6 ते 7 जणांना उमेदवारी द्यायची असल्याने ही अडचण निर्माण झाली,” असा गंभीर आरोप सुजात आंबेडकरांनी केला. पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत काही ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत एकत्र प्रचार करू, तर काही ठिकाणी स्वतंत्र प्रचार करणार आहोत. परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी आगामी रणनितीबाबत माहिती देताना सांगितले की, ठाकरे गटाचा वचननामा पाहिला असून, वंचित बहुजन आघाडीचा वचननामा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर केला जाईल. राज्यातील अनेक ठिकाणी आमचे महापौर निवडून येण्याची शक्यता असून, जिल्हा परिषद निवडणुकांवरही आमचं लक्ष असेल, असेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.