सुजलाम सुफलाम पुणे जिल्हा

मिलन म्हेत्रे
“पुणे जिल्ह्यात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला…’, “बटाटा पिकाच्याबाबतीत आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठाराचे वर्चस्व…’, “उसाच्या बाबतीत तर जिल्ह्यातील समृद्धता शिखरावर पोहोचली’, “भोर परिसर आंबेमोहर, इंद्रायणीच्या घमघमाटाने दरवळला…’ अशा अनेक बातम्या रोज आपण वाचत असतो. त्यामुळेच आपण निसर्गाचे वरदान लाभलेल्या आपल्या पुणे जिल्ह्यातील शेतीबाबतच्या एका विशिष्ट वैभवाकडे आपण गौरवाने पाहू शकतो. अर्थात यासाठी पाण्यापासून खतपुरवठ्यापर्यंत आणि शेतकऱ्याने पिकवलेल्या त्याच्या मालाच्या मार्केटिंगपर्यंत पोषक अनेक गोष्टींचा यात समावेश आहे आणि त्याच समृद्ध गोष्टींतून पुणे जिल्ह्याची आजची भरभराट झाल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्हा केवळ हवामानाच्या दृष्टीनेच नाही तर नैसर्गिकदृष्ट्य्ादेखील समृद्ध आहे. तीनही ऋतूंच्या विशिष्ट ठसा या जिल्ह्यावर आहे. 14 तालुके आणि जवळपास 23 धरणे असलेला हा जिल्हा मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. पश्चिमेकडील हवामान थंड, तर मध्य भागातील कोरडे असून, पूर्वेकडील तालुक्यांमध्ये उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 845.8 मिलिमीटर आहे आणि जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये बहुतांश पाऊस नैर्ऋत्र मोसमी वाऱ्यापासून पडतो. पूर्वेकडील तालुक्यांत ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते.
या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांच्या पाण्याचा वापर हा शेतसाठी जलसिंचनासह, मत्त्स्यपालन, विद्युत प्रकल्प, पिण्याचे आणि औद्योगिक पाणीपुरवठा यासाठी केला जातो आहे. यातील भाटघर हे धरण सर्वांत जुने 125 वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन असून, बाकी धरणांची निर्मिती ही 60-70 च्या दशकातील आहे. त्यामुळे पुणे जिल्हा “सुजलाम् सुफलाम्’ असल्याचे चित्र समोर येत आहे.
भीमा नदीवरील उजनी धरण हे भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखले जात असून, या धरणावर 22 बंधारे बांधले आहेत. हा बहुउद्देशीय प्रकल्प सिंचन, जल विद्युत, पिण्याचे आणि औद्योगिक पाणीपुरवठा आणि मत्स्यपालन आदींसाठी लाभदायक ठरला आहे. सिंचनाच्या सुविधेचा परिणाम म्हणून, सिंचनाच्या परिस्थितीत उगवलेली काही महत्त्वाची पिके ऊस, गहू, बाजरी आणि कापूस आहेत.
चासकमान धरण राजगुरूनगर येथे भीमा नदीवर बांधले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश आसपासच्या गावांना सिंचन आणि वीजपुरवठा हा आहे. हा देशातील दुसरा हायड्रल ग्रीन एनर्जी प्रकल्प असून तो कॅप्टिव पॉवर सक्षम आहे. राज्य विद्युतशक्ती मंडळाच्या माध्यमातून या शक्तीचा उपयोग केला जातो.
मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. या धरणातील पाणी पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी वापरले जाते. या व्यतिरिक्त येथे अडवलेले पाणी टाटा पॉवर कंपनीच्या भिरा जलविद्युत निर्मिती केंद्रातील सहा 25 मेगावॉट पेल्टन टर्बाईन चालवण्यास वापरले जाते.
या धरणांच्या पाणीपातळीच्या दृष्टीने विचार केला तर गेल्या दोन वर्षांपूवीचा दुष्काळ सोडला तर जिल्ह्यातील पावसाने सरासरी गाठलेली असून, बऱ्यापैकी धरणे भरलेली असतात आणि या पाण्याचे नियोजन जलसंपदा खात्याकडूनही चांगल्या पद्धतीने केले जात आहे. कालव्यांना दिली जाणारी आवर्तने, शेततळ्यांचे आणि विहिरींचे शेतकऱ्यांनीच केलेले नियोजन यामुळे देखील पिकांसाठी पाणी देण्याचे प्रमाण हे ठरल्यानुसार होत आहे. त्याचा परिणाम अनेक तालुक्यांमधील शेती पिकांवर सकारात्मकपणे झालेला दिसतो आहे.
ऊस उत्पादक तालुका जिल्ह्याच्या जडणघडणीत सहकाराचा मोठा सहभाग आहे. सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याचा पाणी नियोजनाचा पॅटर्न आदर्श ठरतो आहे. या कारखान्यातील पाण्याचे री-सायकलिंग केले जात असून, येथे येणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
जिल्ह्यात बारामती, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, दौंड हे प्रमुख ऊस उत्पादक तालुके आहेत. उसाला लागणारे पाणी आणि त्याचे नियोजन हे योग्य पद्धतीने होत असल्याने शेतकरी या हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळला आहे. दौंड तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस पाठवला जातोच; पण त्याचबरोबर या भागात गुऱ्हाळांचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आहे.
तालुकानिहाय पिकांचे वैशिष्ट्य् आज पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी पिकांबाबत त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य् दिसून येते आहे. भोर-वेल्हा-मुळशी आणि मावळ हे तालुके आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळांसाठी प्रसिद्ध आहेत, तर पुरंदर सीताफळे आणि अंजीर फळबागांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे.
खेड, आंबेगाव परिसरात द्राक्षांसह तांदूळ आणि ऊस, कांदा-बटाटा ही पिके घेतली जात आहे. सातगाव पठार तर बटाट्यांचे आगरच आहे. इंदापुरात डाळिंबांच्या बागा फुलत आहेत. त्यामुळे भिगवणची एक वेगळी ओळख आता निर्माण झाली आहे. येथील उजनी धरणावर अवलंबून असलेला मत्स्यपालनाचा व्यवसाय सर्वांत मोठा व्यवसाय ठरला आहे. चिलापी, रोहू या माशांनी खवय्यांमध्ये एक वेगळी आवड निर्माण केली आहे.
खेड तालुक्यातही आता झेंडू, ऑयस्टर, शेवंतीसारख्या फुलांची शेती वाढू लागली आहे. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हे अलीकडच्या काळात नर्सरी व्यवसायासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. सर्वच तालुक्यांनी त्यांचे वेगळेपण तर जपले आहेच; पण त्याचबरोबर व्यवसायाभिमुख शेतीशी निगडित अनेक उत्पादनांमध्ये ठसा उमटवला आहे. दुबार-तीनबार पीक नियोजन जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या नियोजनाप्रमाणे दुबार आणि तीनबार पिकांचेही नियोजन केले जात आहे.
खरीप आणि रब्बी हंगामाबरोबरच मधल्या काळात नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्याचबरोबर उसाबरोबरच ज्वारी, मका, कांदा, फळ आणि पालेभाज्या आंतरपीक म्हणूनही घेतली जात आहेत बाजार समित्यांचे कार्य पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राज्यातली पहिली माती व पाणी परीक्षण प्ररोगशाळा सुरू केली गेली. या माती, पाणी परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा अंदाज शेतकऱ्यांना घेता येऊ लागला.
खत व्यवस्थापनेमध्ये माती परीक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांसाठी ही सुविधा नाममात्र दरात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतातील उत्पादकता वाढविण्यासाठी होते आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपबाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी मार्गदर्शनही केले जाते.
बाजारभावाबाबत निश्चिंतता असल्याने आणि एकरकमी उत्पन्न मिळत असल्याने या बाजार समित्यांबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी, नारायणगाव टोमॅटोसाठी, द्राक्ष पिकासाठी, नसरापूर तांदळासाठी, इंदापूर डाळिंबांसाठी अशा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर जिरायती आणि बागायती पिकांचे उत्पन्नाच्या दृष्टीने वर्गीकरण होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत असतो.
कृषी महाविद्यालयाची शिबिरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयांमार्फत जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची शिबिरे घेतली जातात.
यामधून शेतीदूत हे स्वयंसेवक बी-बियाणे, खते खरेदीपासून माती परीक्षण, शेतशिवार, फळ-भाजीपाला पिकांसाठी दरवर्षी मार्गदर्शन करीत असतात. कृषी महाविद्यालयांतील तज्ज्ञांची व्याख्यानेही ग्रामपंचातींमार्फत अथवा विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित केली जातात, त्यातून आधुनिक शेतीबाबत माहिती दिली जात आहे. त्यात सिंचनापासून शेतीवरील विविध रोगांवरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे, त्यामुळे देखील कमी पाण्यात योग्य पिकांचे संवर्धन याबाबत जिल्हा समृद्ध होत आहे, किंबहुना झाला आहे. त्याचमुळे आज तालुक्यांतील ग्रामीण भागांत देखील शेती हिरवीगार दिसत आहे.
पर्यटनाला हातभार
सुजलाम् सुफलाम् पुणे जिल्ह्यामुळे या परिसरात अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायात देखील वृद्धी झालेली दिसून येत आहे. फार्म रिसोर्टचा व्यवसाय, हुरडा पार्टीसारख्या व्यवसायला चालना मिळत आहे. आंबेगाव, दौंड, इंदापूर परिसरातील प्राण्यांची आणि पक्ष्यांची अभयारण्ये आणि या ठिकाणचा पाणवठा हा याच सुजलाम सुफलाम धरतीचा एक प्रमुख भाग बनला आहे.





