आर्थिक विवंचनेतून कामगाराची आत्महत्या

पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाल्हेकवाडी, चिंचवड येथे शनिवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली.
कृष्णात गणपत जगदाळे (वय 38, रा. दत्तनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जगदाळे हे टर्नर म्हणून काम करीत होते. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे ते आपल्या मूळगावी गेले होते. आता सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने ते चारच दिवसांपूर्वी गावाहून शहरात परत आले होते. मात्र त्यांच्या हाताला काम न मिळाल्यामुळे त्यांना नैराश्य आले असल्याचे मयत कृष्णात यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
जगदाळे यांच्या खिशात सुसाइट नोट मिळाली. त्यामध्ये आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. नैराश्यातच घरातून निघाल्यावर त्यांनी नदीच्या पलिकडे चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे काचेची बाटली फोडून हाताची नस कापून घेतली. मात्र त्यामुळे त्यांना मृत्यू येत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांना आली करोना बाधित असल्याची शंका
कृष्णात यांनी गळफास घेतला ही नियमबाह्य कृती आहे. मात्र त्यांनी आत्महत्या करतानाही तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांच्या गळ्यातील दोरी ही रुग्णालयातील बॅन्डेज असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे ते करोना रुग्ण तर नसेल ना, अशी शंका पोलिसांच्या मनात आल्याने काळजीपूर्वक तपास करीत होते.





