Suicide Case – सोशल मीडियावरील फसवणूक आणि मानसिक छळामुळे एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पौड पोलिसांनी तत्पर तपास करत राजस्थानमधून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मृत तरुणी रेणुका लिखिते (वय 25, रा. चिन्मय विभूती आश्रम, कोळवण, ता. मुळशी) ही एम.ए. (बासरी वादन) शिक्षण घेत होती. 6 एप्रिल 2026 रोजी तिने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला आत्महत्येचे कारण स्पष्ट नव्हते; मात्र तांत्रिक तपास आणि मोबाईल विश्लेषणातून या प्रकरणामागे सोशल मीडियावरील फसवणूक असल्याचे समोर आले. तपासात निष्पन्न झाले की, काही अनोळखी व्यक्तींनी खपीींरसीरा द्वारे संपर्क साधून तुझे जुने प्रेम परत मिळवून देतो असे आमिष दाखवले. विविध पूजा व विधी करण्याच्या नावाखाली तिच्याकडून वेळोवेळी सुमारे 74 हजार रुपये ऑनलाइन उकळण्यात आले. त्यानंतर अधिक पैशांसाठी तिच्या कुटुंबीयांना व तिला इजा करण्याच्या धमक्या देत मानसिक छळ सुरू ठेवला. या सततच्या दबावाला कंटाळून तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तांत्रिक पुरावे आणि बँक व्यवहारांच्या आधारे आरोपी राजस्थान राज्यातील बीकानेर जिल्ह्यातील नोखा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पौड पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने किशन ईश्वरचंद लखारा (वय 22) आणि सुनील रामेश्वरलाल भार्गव यांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.