Suicide Case – सायंकाळच्या सुमारास घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर घरात आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने खिडकीतून पाहिले तर बाळाच्या आईने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. ही घटना आपटी (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेने गावकऱ्यांचे मन सुन्न झाले. पूजा राजेंद्र गुजर (वय २२, रा. आपटी, ता. शिरूर), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आपटी येथील गोविंद गुजर हे सायंकाळी घरासमोर असताना त्यांच्या भावाच्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. गोविंद यांनी बाळाच्या आईला आवाज दिला. मात्र, घरातून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. खाली फरशीवर बाळ रडत होते तर बाळाची आई पूजा गुजर हिने घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, हवालदार हेमंत कुंजीर, योगेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने पूजाला खाली घेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गोविंद चिंतामण गुजर यांनी शिकापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.