Satara: एल निनोच्या संकटावर मात करण्यासाठी पाचट वरदान
Satara १२.५ लाख टन पाचट जाळल्याने वातावरणात साधारणपणे १५ ते १८ लाख टन कार्बन डाय ऑक्साइड आणि मोठ्या प्रमाणात मिथेन व नायट्रस ऑक्साइड सोडले जातात, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ वेगाने होते.

Satara: करण्यासाठी पाचट वरदानएल निनोच्या प्रभावामुळे तापमानवाढ, पाणीटंचाई आणि अनियमित पावसाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शेतीसमोरील आव्हानेही गंभीर बनत आहेत. निसर्गाचा बिघडलेला समतोल पूर्ववत करण्यासाठी आता शेतीपद्धतीत बदल करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत उसाचे पाचट शेतात जाळण्याऐवजी त्याची कुट्टी करून जमिनीतच कुजविणे हा पाणीटंचाईवर मात करण्यासह जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रभावी उपाय ठरू शकतो. पाचटातून तयार होणारे सेंद्रिय खत भविष्यातील शेतीसाठी वरदान ठरणार असून, शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार विजेते उद्धव बाबर यांनी केले.
१२.५ लाख टन पाचट जाळल्याने वातावरणात साधारणपणे १५ ते १८ लाख टन कार्बन डाय ऑक्साइड आणि मोठ्या प्रमाणात मिथेन व नायट्रस ऑक्साइड सोडले जातात, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ वेगाने होते. पाचट जळताना कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे परिसरात दाट धुके आणि धूर तयार होऊन हवेची गुणवत्ता अत्यंत खालावते. हवेत तरंगणारे हे सूक्ष्म कण श्वसनाद्वारे मानवी शरीरात जातात आणि दमा, फुफ्फुसाचे आजार व हृदयविकार वाढवतात, हा धोका वेळीच ओळखण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्री. बाबर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होते. या क्षेत्रातून अंदाजे साडेबारा लाख मेट्रिक टन पाचट उपलब्ध होते. या पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास सुमारे चार लाख मेट्रिक टन कंपोस्ट खताची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक ऊस उत्पादकाने पाचट न जाळण्याचा संकल्प करावा, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.





