Sugarcane Labor Fraud – ऊसतोडणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या नावाचा गैरवापर करून शेतकरी आणि कंत्राटदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यात उघडकीस आला आहे. आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणी पाच मुकादमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, फसवणुकीची एकूण रक्कम १ कोटी २२ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बेल्हे येथील शेतकरी विजय बाळासाहेब घोडके यांनी २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी मजुरांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना मोठे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर कराराच्या नावाखाली घोडके आणि त्यांच्या मुलाकडून आरटीजीएस व धनादेशाद्वारे २६ लाख रुपये आगाऊ स्वरूपात उकळले. मात्र, पैसे मिळताच आरोपी मजूर न पाठवता घराला कुलूप लावून फरार झाले. या प्रकरणात ज्ञानदेव तेजराव वाघ, जगन्नाथ रेवननाथ जायभाये, काकासाहेब बाबुराव आगळे, सुधाकर मुरलीधर वाघ आणि राजू लोभा चव्हाण या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान ही फसवणूक केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून, परिसरातील १० हून अधिक शेतकरी व कंत्राटदारांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. सतिश हांडे, भास्कर हांडे, सुरेश औटी, ज्ञानदेव येवले यांसारख्या अनेक कष्टकऱ्यांचे लाखो रुपये यात अडकले आहेत. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, अशा व्यवहारांपूर्वी नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.