Sugarcane Crop Loss : इंदापूर तालुक्यात हजारो एकरांवरील ऊस जळाला; पाटबंधारे विभागाच्या ‘त्या’ चुकीमुळे कोट्यवधींचे नुकसान
Sugarcane Crop Loss : सोसायट्या आणि बँकांच्या कर्जाचा बोजा; कृषी आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची लाभधारकांची मागणी.

Sugarcane Crop Loss – खडकवासला पाटबंधारे विभागाच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून, पाण्याअभावी हजारो एकरांवरील ऊसासह इतर पिके अक्षरशः जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी,
अशी जोरदार मागणी लाभधारक शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहेत. वेळेत आवर्तन न सोडल्याने उसाची पिके करपली असून जनावरांच्या चार्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक शेतकर्यांनी मोठा खर्च करून ऊस लागवड केली होती; मात्र पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पिके वाचवता आली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकर्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, वेळेत पाणी मिळाले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अशी भावना व्यक्त केली.
पंचनामे करून मदत करा
दरम्यान, सोसायट्या आणि बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न सध्या या भागातील लाभधारक शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. वाढत्या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून सरासरी प्रति एकर 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





