नवी दिल्ली – ऊस पिकविणार्या राज्यामध्ये यावर्षी चांगले पर्जन्यमान झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वात जास्त साखर उत्पादन करणार्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व कर्नाटकमधील साखर उत्पादनात भरीव वाढ होणार असल्याचे साखर कारखान्यांच्या संघटनेने म्हटले आहे. इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने सांगितले की, सध्याच्या मूल्यांकनानुसार महाराष्ट्रात 13 दशलक्ष टन, उत्तर प्रदेशात 10.32 दशलक्ष टण, कर्नाटकमध्ये 6.35 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होणार आहे. महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्रफळ गेल्या वर्षाच्या 1.38 दशलक्ष हेक्टरवरून यावर्षी 1.47 हेक्टर झाले आहे. उत्तर प्रदेशातील उसाची लागवड गेल्या वर्षाच्या 2.33 दशलक्ष हेक्टरवरून 2.5 दशलक्ष हेक्टरवर आली आहे. कर्नाटकातील क्षेत्रफळ गेल्या वर्षाच्या 6.4 लाख हेक्टरवरून 6.8 लाख हेक्टरवर गेले आहे. महाराष्ट्रातील ऊस लागवडीचे क्षेत्र उत्तर प्रदेशापेक्षा कमी असूनही साखर उत्पादन मात्र उत्तर प्रदेशापेक्षा जास्त होते. ऊस लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ 5.7 दशलक्ष हेक्टर आहे. गेल्या वर्षीची बरीच साखर शिल्लक आहे. अशा परिस्थितीत यावर्षी साखरेचे उत्पादन वाढणार असल्यामुळे यावर्षी देशातील साखर कारखाने किमान 2 दशलक्ष टन साखरेची निर्यात करू शकणार आहेत. सरकारने तशी परवानगीही दिली आहे. मात्र साखर कारखान्यांनी यापेक्षा जास्त साखरेची निर्यात करण्यास आताच परवानगी दिली तर साखर कारखाने या संदर्भात योग्य उपाययोजना योग्य वेळेत करू शकतील असे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. एकूण साखर उत्पादन वाढणार यावर्षी देशात साखरेचे उत्पादन 18.58 टक्क्यांनी वाढून 30.95 दशलक्ष टन होईल. गेल्या वर्षी 26.1 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाची पाच दशलक्ष टन साखर शिल्लक आहे. तर इथेनॉल उद्योगाला 3.4 दशलक्ष टन साखर उपलब्ध होईल. शिल्लक साखर आणि नवी साखर अशी एकूण उपलब्धता 35.95 दशलक्ष टनापर्यंत जाईल. देशाला दरवर्षी 28.5 दशलक्ष टन साखर लागते. एकूण आकडेवारी पाहता साखर निर्यात वाढून साखर कारखान्यांचे आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार आहे.