प्रभात वृत्तसेवा भोसरी – श्रावण महिन्यात नागपंचमीपासून सणासुदीला सुरूवात झाली. मात्र असे असताना केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याचा साखर कोटा घटविल्याने पिंपरी-चिंचवड शहरात साखरेच्या दरात दोन रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळीच्या तयारीला लागलेले व्यापारी आणि ग्राहक दोघेही चिंतेत सापडले आहेत. मागणी वाढत असतानाही कोट्यात घट झाल्याने शहरातील किरकोळ बाजारात साखरेचे दर ४६ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी केवळ २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा देशभरासाठी खुला केला आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २.५ लाख टनांनी कमी आहे. या निर्णयाचा थेट परिणाम पिंपरी-चिंचवड परिसरात जाणवत असून, आठवड्याभरात साखरेचे दर ४४ वरून ४६ रुपये प्रति किलोवर गेले आहेत.कोटा कपातीमुळे पुरवठ्यावर मर्यादा येणार असून, दरवाढ टाळता येणार नसल्याचे मत स्थानिक किराणा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भोसरीतील किराणा व्यापारी प्रभाकर काटकर यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा कोटा कमी आहे. श्रावण महिन्यात व पुढे येणाऱ्या सणांमुळे साखरेची मागणी खूप वाढते. मात्र पुरवठा कमी असेल तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर सणाचा आनंद फिक्का होईल.शहरातील गोडव्याचे सण आता महागाईच्या झळांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मिठाई बनवणारे लघुउद्योजक, हलवाई, तसेच खाद्यपदार्थ विक्रेते यांनाही याचा फटका बसणार आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने साखरेचा कोटा वाढवावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह ग्राहकांकडून केली जात आहे. अन्यथा, सणाच्या काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ मिठाईवर नव्हे, तर सर्वसामान्यांच्या घराघरातील गोडपणावर होणार आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर सणाचा गोडवा कमी होण्याची शक्यता शहरात दिसून येतेय.